पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी ही घटना उघडकीस आली. शिवराय तुकाराम ऐवळे वय- ६० आणि शांताबाई शिवराय ऐवळे अशी आत्महत्या केलेल्या आरोपी आणि मयत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या शिवराय यांचे वय साठ वर्ष आहे. ते आणि त्यांची पत्नी शांताबाई, मुलगा, नात, सून हे एकत्र राहतात. आज घरात कोणी नसताना चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर झालेल्या शिवराय यांनी शांताबाई यांच्या डोक्यात पाट्याने घाव घालून खून केला. मग, स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे. त्यांची सून घरी आली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. चरित्र्याच्या संशयावरून खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Story img Loader