पत्नीच्या इच्छेविरुद्ध आपल्या दीड वर्षांच्या मुलीस बहिणीला दत्तक देण्याच्या दाव्यात महिलेला न्यायालयाने दिलासा दिला आहे. ‘मुलीचे वय लहान असल्यामुळे तिची काळजी ही फक्त आईच घेऊ शकते, त्यामुळे तिचा ताबा आईकडेच राहील,’ असा आदेश न्यायालयाने दिला आहे. महिलेच्या ताब्यातून मुलीस नेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईच्या सूचना संबंधित पोलीस ठाण्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. देवरे यांनी दिल्या आहेत.
या महिलेचे अडीच वर्षांपूर्वी हडपसर येथील एका सराफाशी लग्न झाले. लग्नानंतर या महिलेला मुलगी झाली. त्या पतीच्या बहिणीला मूलबाळ नसल्यामुळे त्याने ती मुलगी बहिणीला दत्तक देऊ असे तो पत्नीला सांगू लागला. त्यानुसार दररोज सकाळी मुलीला त्याच्या बहिणीकडे सोडू लागले. मात्र, त्या महिलेने त्याला विरोध केला असता तिला मारहाण केली. त्यामुळे ती महिला मुलीस घेऊन माहेरी आली. तरीही त्या महिलेला त्रास सुरू राहिल्यामुळे तिने अॅड. सुप्रिया कोठारी यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दावा दाखल केला आणि मुलीचा ताबा आईकडेच राहावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज केला. दीड वर्षांच्या मुलीला न्यायालयासमोर आणले. त्यावरून न्यायालयाने मुलगी लहान असून तिची काळजी फक्त आईच घेऊ शकते. त्यामुळे तिचा ताबा आईकडेच ठेवण्याचा आदेश दिला.