“मावळ गोळीबार प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी देखील शेतकरी आहे, माझी जात शेतकरी आहे. मी माझ्या ३० वर्षांच्या राजकीय जीवनात सत्तेचा गैरवापर करत विरोधकांना कधीच त्रास दिला नाही. महाराष्ट्रात एक विरोधक दाखवा ज्याला सत्तेचा गैरवापर करून त्रास दिला. विकास करत असताना कोणाला वाऱ्यावर सोडायचं नाही ही आमची भूमिका आहे.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते मावळ तालुक्यात विविध विकास कामांच्या भूमीपूजनांचे कार्यक्रम देखील पार पडले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “मावळकरांना एक विनंती आहे. विकासाची काम करत असताना. तुम्ही अशा ठिकाणी वसला आहात. की, मुंबईमधून पुण्याला जाताना मावळमधूनच जावं लागतंय. त्यामुळं नवीन आणि जुना पुणे – मुंबई महामार्ग रुंदीकरण करायचं म्हटलं तरी तुमच्या जमिनी घ्याव्या लागतात. घाटातील वाहतूक कोंडी सोडवायची त्यासाठी पूलाचं काम चाललं आहे. त्याकरिता देखील मावळमधील जमीन घ्यावी लागत आहे. काही सुधारणा, विकास करायचं म्हटलं, उद्योग आणायच म्हटलं तर जमिनी लागतात. हे नाकारता येत नाही. पण…आम्ही एक करू चारपट रक्कम देऊ. जेणेकरून तुमच्या पुढील पिढीला पण काहीतरी करून ठेवता आलं पाहिजे. अशी भूमिका आमची आहे. त्यामुळं काळजी करू नका.” असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
तसेच पुढं ते म्हणाले की, “ज्या समाजाला आरक्षण दिलं आहे. त्याला धक्का न लागता इतरांना कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. पुढे ते म्हणाले की, महागाई वाढली आहे, पेट्रोल-डिझेलचे दर वाढलं आहे. यावर केंद्र सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. नागरिकांना जगणं कठीण झालं आहे. यावर केंद्र सरकार बोलायला तयार नाही. हेच का अच्छे दिन? कुठे गेले अच्छे दिन?. दिल्लीत शेतकऱ्याच आंदोलन सुरू आहे पण त्यांच्यासोबत कोणी बोलायला तयार नाही.” अशी टीका देखील त्यांनी केली आहे.