पुण्याचा विकास या मुद्यावर मी ठाम आहे आणि त्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. विकासाच्याच मुद्यावर मी पुण्यातून आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार आहे, या वक्तव्याचा पुनरुच्चार खासदार सुरेश कलमाडी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत   केला. पक्षातून झालेले निलंबन रद्द होईल, असेही ते म्हणाले.
कलमाडी यांच्या खासदार निधीतून महापालिकेत पर्जन्यजल संधारण प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन कलमाडी यांनी महापालिकेत येऊन शनिवारी केले. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली आणि तेथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कलमाडी यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर गेल्या वर्षी महापालिकेतील क्रीडा समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विकासाच्याच मुद्यावर आगामी लोकसभा लढणार आणि त्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही, असे जाहीर केले होते.
त्या वक्तव्यावर तुम्ही आजही ठाम आहात का असे विचारले असता होय, मी त्या वक्तव्यावर ठाम आहे, असे कलमाडी म्हणाले.पक्षाने तुम्हाला निलंबित केले आहे, निलंबन मागे घेऊन तुम्हाला काँग्रेसतर्फे उमेदवारी दिली जाईल असे वाटते का, या प्रश्नावर मी आशावादी आहे, असे कलमाडी म्हणाले.