राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारणात चांगली पकड आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी या निवडणुकीत नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं. त्यानंतर, आता आगामी काळात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचं नाव आता पंतप्रधान पदासाठी घेतलं जात आहे. परंतु, मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. काल (२२ मे) पुण्यात बालगंधर्व मंदिर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात दबदबा आहे. विरोधकांची मोट बांधण्याकरताही त्यांच्या नेतृत्त्वाची गरज असल्याचंही म्हटलं जातंय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जर विरोधकांच्या ऐक्याला बळ मिळालं तर शरद पवार पंतप्रधानांचा चेहरा असतील, अशी चर्चा आहे. परंतु, या सर्व चर्चा शरद पवारांनी धुडकावून लावल्या आहेत.

“पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही. आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली, त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे. मी पुढची निवडणूकच लढवणार नाहीय, मग पंतप्रधान पदाचा संबंधच येत”, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा >> २००० ची नोट चलनातून मागे, शरद पवारांची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “एखाद्या लहरी माणसाने…”

राहूल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचा जनमानसात झालेला परिणाम याचे एक उदाहरण आपल्याला कर्नाटकमध्ये पाहायला मिळाले. अशाप्रकारे लोक राहूल गांधी आणि त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शक्ती देतील याची मला खात्री आहे, असंही ते म्हणाले.

जागावाटपाबाबत काय बोलले शरद पवार?

महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या जागावाटपाची चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुंबईच्या महानगरपालिकेत कसे जावे याची चर्चा आमच्यात होणार आहे. यामध्ये काही लोकांचे मत आहे की काँग्रेसने स्वतंत्र लढावे, इतरांनी स्वतंत्र लढावे मात्र यामध्ये काही वेगवेगळी मत आहेत. यावरही काही निर्णय झालेला नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.