राष्ट्रवादीकडून मावळ लोकसभेसाठी लढण्यास आपण इच्छुक आहोत. मात्र, उमेदवारी दिल्यास पक्षाची संपूर्ण यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, याचा विश्वास व खात्री दिल्याशिवाय आपण निवडणूक लढणार नाही. तुमच्या षड्यंत्रात मी बळीचा बकरा का होऊ, अशा शब्दात माजी महापौर व मावळचे प्रबळ दावेदार संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी नेत्यांचा संभाव्य डाव उघड केला आहे.
राष्ट्रवादीत मावळच्या उमेदवारीवरून घोळ सुरूच आहे. अंतिम टप्प्यात वाघेरे तसेच गणेश खांडगे यांचे नाव चर्चेत आहे. तथापि, काहीतरी वेगळे सुरू असल्याची शंका वाघेरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. वाघेरे म्हणाले, लक्ष्मण जगताप िरगणात नसतील तर आपण लढू, असे आपण पक्षनेतृत्वाकडे स्पष्ट केले आहे. मात्र, पक्षाची भूमिका स्पष्ट होत नसल्याने सगळीकडे संभ्रमावस्था आहे. नेत्यांनी ही संभ्रमावस्था दूर करावी आणि योग्य ती दिशा कार्यकर्त्यांना द्यावी. मात्र, तसे होत नसल्याने पक्षाची हानी होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी सुरू आहेत. वर्तमानपत्रात तसेच वाहिन्यांमध्ये बातम्या प्रसारित होत आहेत, ते पाहता काहीतरी  षड्यंत्र होत आहे. उमेदवारी दिल्यास पक्षाची यंत्रणा पूर्णपणे पाठिशी हवी. तरच, निवडणूक लढवू. उगीचच षड्यंत्राचा बळी ठरणार नाही. चिंचवडला भाऊसाहेब भोईर यांच्या बाबतीत जे राजकारण झाले, त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. तसाच प्रकार होणार असेल तर जगतापांनी पक्षाची अधिकृत उमेदवारीच घ्यावी, ते पक्षाहिताचे राहील, असे वाघेरे यांनी म्हटले आहे.
गणेश खांडगे यांचा नकार?
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते गणेश खांडगे हे मावळ मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार असल्याचे बोलले जात असले, तरी त्यांनी मात्र त्यासाठी नकार दर्शवला आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवले असल्याचे समजते. त्यामुळे मावळमधून राष्ट्रवादीतर्फे नेमके कोण उभे राहणार, याबाबतची अनिश्चितता आणखी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा