पुणे : समाजवादी विचारांशी एकनिष्ठ राहूनही राजकीय आणि सामाजिक विषयांवरील स्पष्टपणाने व्यक्त केलेली मते, राजकीय क्षेत्रात व्यग्र राहूनही क्रिकेट, चित्रपट आणि अभिजात गायन श्रवण हे छंद जोपासणारे ज्येष्ठ नेते एस. एम. जोशी या समाजवादी नेत्याचा प्रवास त्यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘मी एस. एम.’ या लघुपटातून मंगळवारी उलगडला. अण्णांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्याच कथनातून पडद्यावर पाहताना सभागृहातील समाजवादी साथी त्या मंतरलेल्या दिवसांमध्ये रममाण झाले.
ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण सेंटर निर्मित ‘मी एस. एम.’ हा लघुपट एस. एम. जोशी सभागृहात दाखविण्यात आला. यानिमित्ताने लघुपटाचे दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांनी संवाद साधला. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे विश्वस्त सचिव सुभाष लोमटे आणि प्रा. सुभाष वारे या वेळी उपस्थित होते.
डॉ. पटेल म्हणाले, ‘बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी असताना मी शिक्षकांचे नाटक बसवले होते. त्यामध्ये अण्णांचे पुत्र, माझे गुरू व बालरोगतज्ज्ञ डाॅ. अजय जोशी यांनी भूमिका केली होती. तळेगाव हॉस्पिटलमध्ये मला डॉ. अजय जोशी यांचा सहवास लाभला. त्यामुळे मी त्यांच्या घरातील एक सदस्य झालो होतो. अण्णांवर लघुपट करण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिले.’
‘यशवंतराव चव्हाण सेंटरचे संस्थापक असलेल्या एस. एम. जोशी यांच्यावरील लघुपटासाठी शरद पवार यांनी एक लाखाचा धनादेश दिला होता. तीन तपांपूर्वी निर्मिती झालेला हा दस्तावेज किती महत्त्वाचा आहे, हे लोकांनी ठरवले पाहिजे. निखळ प्रामाणिकपणाचे अण्णा हे शेवटचे उदाहरण असू शकेल. समाजवादी विचारांशी एकनिष्ठ राहूनही त्यांनी त्यांची मते मांडली आहेत. अवघ्या दोन महिन्यांत हा लघुपट चित्रित झाला आहे. त्यानंतर या मालिकेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज आणि पु. ल. देशपांडे यांच्यावर लघुपटाची निर्मिती झाली,’ असे पटेल यांनी सांगितले.