प्रतिनिधी, पिंपरी
कथित प्रेयसीची क्षमा मागण्यासाठी ‘आय एम सॉरी’चे जवळपास ३०० बेकायदेशीर फलक लावून खळबळ उडवून देणाऱ्या ‘त्या’ प्रेमवीरावर कारवाई करण्याची पोलीस आणि पालिकेची भाषा एकाच दिवसात बदलली आहे. नात्यागोत्याच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या राजकीय दबावापुढे या दोन्ही यंत्रणा झुकल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी रात्री पिंपळे गुरव, कल्पतरू चौक, पिंपळे सौदागर, जगताप डेअरी, भुजबळ चौक, वाकड आदी परिसरात होर्डिग तसेच पालिकेच्या पोलवर तब्बल ३०० जाहिरात फलक उभारण्यात आले. ‘शिवडे, आय एम सॉरी’ असा मजकूर त्यावर होता आणि शेजारी छोटेसे बदामाचे चिन्ह होते. या प्रकाराची खूपच चर्चा झाली. पोलिसांपर्यंत याबाबतची तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी संबंधितांचा शोध घेतला. फलक लावणाऱ्याचे मित्र, फलक छापणारे पोलिसांना मिळाले. ही लघुपटाची जाहिरात असल्याचे त्याने सुरुवातीला पोलिसांना सांगितले. कसून चौकशी केली असता, हे प्रेमप्रकरण असल्याचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रेमवीराला चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र, त्याच वेळेला संबंधित तरुणाला वाचविण्यासाठी राजकीय क्षेत्रातून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले होते.
संबंधित तरुणी या पट्टय़ात राहते, तर हा प्रेमवीर पुण्यातील रहिवासी असून त्याचे चुलते नगरसेवक आहेत. पिंपरी-चिंचवडचे काही प्रभावी नेतेही त्याचे नातेवाईक आहेत. याचा पुरेपूर फायदा मिळाल्याने प्रेमवीराच्या उद्योगाला संरक्षण मिळाले. सुरुवातीला या प्रकरणाचा बोभाटा झाला, तेव्हा पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले होते. बेकायदेशीरपणे जाहिराती लावल्याप्रकरणी महापालिकेने कारवाईची भूमिका घेतली होती. मात्र, पोलीस व महापालिका प्रशासनावर राजकीय दबाव आल्यानंतर चित्र एकदमच पालटले. संबंधितावर पुढे कोणतीही कारवाई किंवा साधी चौकशीही झाली नसल्याबद्दल आश्चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे.