लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्याच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कार्य करत आहेत. त्यांना अजित पवार यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे लोककल्याणासाठी मी आणि अजित पवार असे दोन्ही दादा एकत्र आलो आहोत. त्यामुळे जनहितांच्या प्रकल्पांना गती मिळत आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मांडली.
कोथरूड मतदारसंघातील बाणेर पश्चिम, सूस-म्हाळुंगे आणि पाषाण येथील सोसायटी भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून महानगर गॅस व्यवस्था उपलब्ध व्हावी; अशी मागणी होती. त्यानुसार कंपनीला महापालिकेची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजप पदाधिकारी गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, सचिन पाषाणकर, लहू बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष समीर चांदोरे या वेळी उपस्थित होते.
प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आग्रह आहे. त्याच प्रेरणेतून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार काम करत आहे. मी आणि अजित पवार एकत्र आल्याने शहर विकासाला गती मिळत आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. विमानतळ परिसरातील मेट्रो प्रकल्प डिसेंबर महिन्यात कार्यरत होईल. कोथरूडमध्ये १०० आदर्श सोसायटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असेही पाटील यांनी सांगितले.