आगामी नववर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभेच्या आणि मग विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणुकांसाठी राज्यातील पक्षांनी कंबर कसली आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या निवडणुकांच्या पार्श्वभूीमवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेने खासकरून पुण्याकडे सर्वाधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आज पुण्यात आयोजित केलेल्या शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास या विषयावर राज ठाकरेंनी परखड भाष्य केलं. शहर नियोजनात स्थापत्यकलेचं किती महत्त्व असतं? या विषयावर त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. तसंच, मी सत्तेत आल्यानंतर शहर नियोजनातील त्रुटी भरून काढण्यासाठी प्लान आखणार असल्याचंही त्यांनी आज सांगितलं. या माध्यमातून त्यांनी जनतेला एकप्रकारे आश्वासनच दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “वाजपेयींचा सुरक्षा अधिकारी मला म्हणाला, ताज हॉटेल झाकावं लागेल”, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

“मी गेल्या २५ वर्षांपासून पुण्यात येतोय. मी हजार वेळा सांगितलंय. मुंबई बरबाद व्हायला काळ गेला, पुणं बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलंय? इथे पाच पाच पुणे आहेत. हिंजवडीकडचं पुणे वेगळं, इकडचं पुणं वेगळं, नदीकाठचं पुणं वेगळं, विमाननगरचं पुणं वेगळं.. कुणाचा कशाला काही संबंधच उरलेला नाहीये. पुणं म्हणून कुठे काही राहिलंय? याचं कारण राज्यकर्त्यांचं लक्ष नाहीये”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी पुण्यातील परिस्थितीवर भाष्य केलं.

“दळणवळण आल्यानंतर आजूबाजूच्या गोष्टी बदलायला लागतात. हे राज्यकर्त्यांना कळलं पाहिजे की, हे बदलणार आहे, याचं टाऊन प्लानिंग आताच केलं पाहिजे. पण ते होत नाही. तशी व्यवस्थाच नाही. ज्यांना याच्यात गती नाही, माहिती नाही रोजच्या पाकिटावर जगणारे आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? मग महानगर पालिका आणि राज्य सरकारकडून हेच निकाल मिळणार. कोकणात ब्रिज पडला, २०-२५ मिनिटांची बातमी आली. विषय संपला. माणसं मेली असती खाली तर मरूदेत”, असा संताप राज ठाकरेंनी यावेळी केला.

हे टाळण्यासाठी काय करता येईल? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “इतके आर्किटेक आहेत की सगळ्यांनी शपथ घेतली तरच हे होऊ शकतं. एकाने नकार दिला आणि दुसऱ्याने स्वीकारलं तर दुसरा म्हणेल मी काय चुकी केली? पण मी तुम्हाला शब्द देतो शब्द, यांच्यासारखं नाही हं, बाकीच्यांसारखं नाही. माझा शब्द म्हणजे शब्द असतो. जेव्हा माझ्या हातात महाराष्ट्र राज्याची सत्ता असेल त्यावेळेला या महाराष्ट्राचं संपूर्ण प्लानिंग करायला आर्किटेक लोकांच्या हातात देईन”, असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं.

हेही वाचा >> “त्या बाथरूममध्ये मी पळत पळत अंघोळ करू का?”; राज ठाकरेंच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये पिकला हशा

“सरकारमध्ये इंजिनियरला महत्त्व, आर्किटेक्टला नाही”

“महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जेवढं महत्त्व इंजिनियरला आहे तेवढं महत्त्व आर्किटेक्टला नाही. त्यामुळे तुमचे रस्ते, वास्तू कसे असणार हे इंजिनियर ठरवतो, आर्किटेक्ट ठरवत नाही,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा >> “हल्ली पाच पाच पुणे झाले आहेत, कुणाचा काही…”, राज ठाकरेंचं मुलाखतीत परखड भाष्य; म्हणाले, “हे शहर बरबाद व्हायला…!”

“सौंदर्यदृष्टी राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते”

“आपल्याकडे असे विचार करणारे लोक आहेत. म्हणून ही सौंदर्यदृष्टी राज्यकर्त्यांमध्ये असावी लागते. जो राज्य करतो त्यांनी या गोष्टी बघाव्या लागतात,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I give you words raj thackerays assurance to the public said maharashtra state power sgk