को ऽ हं-  मी कोण असा प्रश्न मला नेहमी पडतो. मात्र त्यामागे अध्यात्म वा तत्त्वज्ञान अथवा चिंतन या सदरातली भूमिका नाही. मी पुणेकर की मुंबईकर एवढय़ाच मुद्दय़ापुरता हा गहन प्रश्न, किंबहुना कोडं आहे. ‘मुद्यापुरता’च्या आधी ‘किरकोळ’ हा शब्द लिहिणार होते. पण तो पेनाआधी मनानंच खोडून टाकला. मुंबैकर वा पुणेकर असणं हा मुद्दा किरकोळ असूच शकत नाही. हे दोन्ही ‘कर’ या स्वतंत्र भारतातल्या कधीही मिटणार नाहीत अशा जाती आहेत. जागतिकीकरण गेलं (दोन्हीकडच्या रस्त्यांवरच्या) खड्डय़ात! भारतीयकरणसुद्धा राहिलं दूर. यू आर आयदर मुंबैकर ऑर पुणेकर! मधला मार्ग नाही!!
हे मला दोन्हीकडे अनेक वर्षे घालवल्यानंतर कळलंय, पण प्रश्न सुटत नाही तो नाहीच. जन्मानं मी मुंबैकर; पण या जगातली सुरुवातीची तीन-चार वर्षच मी तिथे काढली. ‘हंस’ मासिकासाठी प्रेस काढण्याकरिता वडिलांनी पुण्याला स्थलांतर केलं ना! शाळा-कॉलेजची- म्हणजे जडणघडणीची की काय म्हणतात ती वर्ष पुण्यात गेली. तेव्हा मी स्वत:ला पुणेकर समजावं हे रीतीला धरून होईल. पण पंचाईत अशी की, मुंबईचा क्रिकेट संघ रणजी ट्रॉफीत हरला, तरी पाकिस्तानविरुद्ध इंडिया हरल्यासारखं मला दु:ख होतं. क्रिकेट ओ की ठो कळत नसलं तरी! त्या अर्थी रक्तातलं मुंबैकरपण अद्याप कायम असावं. मात्र ‘पुण्यात चहाच्या वेळेला गेलं तरच पुणेकर चहा पाजतो’ असे कुणी मुंबैकरानं म्हटलं तरी माझं रक्त उसळतं. त्या अर्थी माझ्यात कुठे तरी पुणेकर असलाच पाहिजे. म्हणूनच सासर-माहेरचं नाव लावणाऱ्या आधुनिक स्त्रीप्रमाणे स्वत:ला मुं(बई) पुणेकर म्हणणं मला बरं वाटतं. त्यातून जन्म आणि कर्म भूमींशी मी नातं कायम ठेवलं आहे.
अर्थात, मी हा डबल रोल यशस्वीपणे करीत आले असले, (माझ्या मते!) तरी माझ्या दोन्हीकडच्या मित्र-मैत्रिणींना आणि खास करून व्यवसाय बंधू-भगिनींना आणि सहकाऱ्यांना तो पटत नाही.  मतभेदाचे आणि पात्रतेचे किंवा हक्क-अधिकाराचे प्रश्न उभे राहिले, की मुंबैकर मला पुणेकर म्हणून नामोहरम करतात आणि पुणेकर ‘शेवटी मुंबैकरच’ अशी माझी संभावना करतात. (तात्पर्य: इतकी वर्ष दोन्ही शहरात आणि पत्रकारितेत राहूनही मला मुंबैरत्न, पुण्यभूषण राहोच, गोरेगावरत्न किंवा कोथरूडभूषण सन्मान अथवा तत्सम कोणताही पुरस्कार मिळण्याची सुतराम शक्यता नाही ती नाहीच. असो. आपलीच मुंबै अन् आपलंच पुणं! सांगते कुणाला न्  ऐकतो कोण!)
दोन्हीकडच्या लोकांचं काही म्हणणं असो, मला तरी दोन्हींमध्ये मुंबै सख्खी- पुणं चुलत असा भेदभाव करण्याचं कारण सापडत नाही. (दोघं माझी सारखीच उपेक्षा करतात.) दोन्हींमध्ये फरक थोडे आणि समानता आहेत. त्या समानतेतही भारत वर्षांची बहु विविधतापूर्ण एकता आहे; प्रादेशिक अस्मिता आणि वैशिष्टय़ं आहेत.
फरक असलाच तर तो तसा किरकोळ आहे. मुंबईत उकाडा आणि घाम फार आहे. पुण्यात निदान भल्या सकाळी आणि उशिरा संध्याकाळी छान गारवा असतो. पण पुण्यातली दुपार मुंबैपेक्षा दाहक असते. भट्टीतल्या पावासारखी किंवा ओव्हनमधल्या पिझ्झासारखी ती माणसाला भाजून काढते. पुण्याचं वीजमंडळ आधी भरमसाठ बिलं देऊन चटके देतं आणि दुरुस्ती करून घ्यायला गेलं, तर मंडळकार सरकारी मंडळी आडवे-तिडवे प्रश्न विचारून ऐन हिवाळ्यात तुम्हाला घाम फोडतात. मुंबैकर वीजमंडळसुद्धा चोपून बिल लावतं; पण निदान रोजच्या रोज वीजपुरवठा करतं. पुण्यात वीज कधी असेल याची खात्री नसते. ती नसण्याची मात्र गॅरंटी असते. माणसांप्रमाणे इथल्या विजेमध्ये हार्टफेलचं प्रमाण मोठं आहे. मुंबैतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे मुंबैमधल्या कोणालाच ऑफिसातल्या कर्मचाऱ्याला समोरच्याशी, खास करून काही तरी काम घेऊन आलेल्या माणसाशी बोलायला वेळ नसतो. तो एक तर सहकाऱ्यांशी बोलण्यात बिझी असतो, नाही तर मोबाइलवर!
पुणेकर कर्मचारी मात्र केवळ पाच मिनिटात तुमची पाळमुळं खणून काढणारी चौकशी करतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वीच आपला पुढचा क्षण तुरुंगात असेल का, या भयशंकेनं माणूस थिजून जातो. सर्व रेल्वेस्थानकं, विमानतळ आणि सीमारेषा या ठिकाणी पुणेकर कर्मचारी नेमल्यास देशातल्या घुसखोरांची आणि अतिरेक्यांची संख्या झपाटय़ानं कमी होईल. नाही मी बोलत आता, ही मुंबैकर कर्मचाऱ्याची तऱ्हा पुणेकर आणि मुंबैकरही मराठी व किराणा दुकानदारांनी अनुसरली आहे. तुम्हाला तिष्ठत ठेवून इतरांशी बोलण्यात किंवा मागून आलेल्यांना आधी सेवा(!) देण्यात दोघांना जगण्याचं सार्थक वाटतं. विचारलेल्या प्रश्नांना तुसडा हुंकार (तोही खर्जातला!) किंवा तुच्छतादर्शक ‘च्यॅक’ असा ध्वनीसंपन्न नकार देण्यात दोन्हीकडच्या दुकानदारांचं तोंड कुणी धरू शकणार नाही.
शब्दांची अशी काटकसर दोन्हीकडच्या बससेवेला मंजूर नाही. फरक असेलच तर तो इतकाच की, पुण्याच्या बसमध्ये कंडक्टर सतत बोलत असतो, तर मुंबैच्या बसमध्ये ड्रायव्हर! मुंबैचा कंडक्टर तुम्ही बसमध्ये चढताच तिकीट देऊन मोकळा होतो आणि बसमध्ये जागा असली तर बसून घेतो. पुण्याचा कंडक्टर ‘सुट्टे द्यायचे बरं का, नाही तर उतरून घ्यायचं’ अशी प्रेमळ तंबी देऊन सुट्टय़ा पैशाची टंचाई या विषयावर भाषण सुरू करतो. ‘‘सारखे सुट्टे द्यायला आम्ही नाणी छापतो का’’ अशी मूल्यवान माहिती पुरवतो. त्याच वेळी त्यानं तुमच्याकडची दहाची नोट घेतलेली असते; पण तो तुमचा स्टॉप येईपर्यंत तुम्हाला तिकीट मात्र देत नाही. (या मानानं निवडणुकीचं तिकीटसुद्धा लवकर मिळत असावं) आणि जेव्हा तो तिकीट देतो तेव्हा उरलेले पैसे परत देत नाही. त्याचं कारण त्यानं आधीच जाहीर केलेलं असतं ना! त्यातून एखाद्यानं चिकाटीनं पैसे मागितलेच, तर ‘‘डेपोमध्ये येऊन घेऊन जा’’ असा सल्ला देतो. हे सगळं चालू असतानाच जमेल तेव्हा स्टॉपची घंटी देणं, जमेल तिथं प्रवाशांना उतरवणं आणि बसमध्ये आलेल्यांचा उद्धार करणं ही कर्म तो सफाइनं पार पाडत असतो. फार तर या सगळ्यात तुम्ही दोन स्टॉप पुढे उतरता आणि जिथे तुम्ही उतरता तिथे स्टॉप नसतोच.
भारताच्या विराट लोकसंख्येचं दोन्हीकडचे कंडक्टर आपापल्या परीनं कौशल्यानं नियंत्रण करीत असतात. पुण्यातल्या प्रवाशांना त्यांची ‘औकात ओ हैसियत’ दाखवून, तर मुंबईतला महामुत्सद्दी! तो शक्य तर गर्दीच्या वेळी अधलेमधले स्टॉप घेतच नाही. ड्रायव्हरनं चुकून एखाद्या स्टॉपवर बस स्टॉप केली, तर हा चपळाईनं घंटा देऊन ‘मागून रिकामी बस येत्येय’ असं मधाचं बोट लावून पळ काढतो. ‘स्टॉप सांगा बरं का’ असं सांगणाऱ्यांना तो तत्परतेनं सहकार्य करतो. पुण्यातला कंडक्टर तुम्हाला दोन स्टॉप पुढे सोडत असेल तर हा, दोन स्टॉप अलीकडे उतरवून बसमधल्या लोकसंख्येचं नियोजन करतो.
त्याच्या अबोलपणाचं मूळ त्याच्या सौजन्यापेक्षा त्याच्या तांबूल प्रेमात आहे. ते प्रेम इतकं थोर आहे की, शेडय़ुलमध्ये नसलेले स्टॉप तो घेतो. हे स्टॉप नेमके पानबिडी स्टॉलपाशी असतात हा निव्वळ योगायोग! चपळाईनं ड्रायव्हरकडून त्याच्या ऑर्डरचे पैसे घ्यायचे. विद्युत वेगानं स्टॉलवर पोचायचं (तरीच बरं का, मुंबइची बस आणि वीज सेवा ‘बेस्ट’ या एकाच कंपनीशी जोडलेली आहे) रॉकेटच्या गतीनं परत येऊन ड्रायव्हरचा माल त्याच्यापाशी देऊन स्टॉपची घंटी द्यायची, ही त्रिविध कामं तो ज्या कौशल्यानं करतो, त्याला तोड नाही. या धावपळीनं दमल्यामुळे म्हणा किंवा पान तत्परतेनं तोंडात टाकल्यामुळे त्याला बोलायला तोंडच नसतं. (त्यालाही नसतं आणि प्रवाशालाही!) शिवाय बस ड्रायव्हर पुढच्या दारातून येणाऱ्यांना परतवणं, उतरणाऱ्यांना घाई करणं ही त्याच्या वाटय़ाची कामं करीतच असतो. त्याखेरीज ओव्हरटेक करणाऱ्यांच्या आई-माई-ताईचा वाचिक उद्धार करण्याचं कार्य तो करीत असतो ते वेगळंच! मुंबईत एखादी आजाराची साथ आली तर याला डॉक्टरपेक्षा जास्त आनंद होतो. ‘या साथीत भरपूर जण जातील आणि बसमधली गर्दी कमी होईल’, असे निर्दय विनोद तो बिनदिक्कत करतो, तेव्हा आपल्याला मेल्याहून मेल्यासारखं होतं.
कंडक्टरप्रमाणेच दोन्ही शहरांमधल्या प्रवाशांमध्ये एक पारदर्शी साम्य आहे. दोन्हीकडच्या पुरुष प्रवाशांना बसमधलं महिलांकरिताच्या जागेचं आरक्षण मुळीच मान्य नाही. ‘जागा द्या ना हो’ अशी विनंती करणाऱ्या स्त्रियांना ते मुळीच दाद देत नाहीत. मुंबईतले त्यातल्या त्यात समजूतदार! ते झोपेचं नाटक करून भावी संघर्ष टाळतात. पण एखादी बाई चिवट किंवा खट निघाली तर कवच-कुंडलं दिल्याच्या थाटात जागा रिकामी करतात. पुणेकर हाडाचाच तत्त्वप्रेमी असल्यामुळे वाद घालू लागतो. जागा सोडावीच लागली तर स्त्रीमुक्तीच्या निषेधार्थ जाहीर भाषण देऊ लागतो. ज्यांचे उतरायचे स्टॉप लांबचे असतात ते पुरुष त्याला साथ देऊन परिसंवाद भरवतात. अर्थात, महिलावर्गही तिथल्या तिथे प्रत्युत्तर देतोच.
आरक्षणाचा हा ज्वलंत मुद्दा सोडला, तर मुंबइतला बस प्रवास शांततेनं पार पडतो. समोरचा माणूस जिवंत असल्याचं दिसतंय तोवर मुंबैकर बसमध्येच काय, कुठेही दुसऱ्याची दखल घेत नाही. त्यामुळे गर्दीत असूनही मुंबैत मनासारखं जगता येतं. पुण्यातला बसमधला ‘हमसफर’ प्रायव्हसी जपण्यावर विश्वास ठेवणाराच असेल असं सांगता येत नाही. विशेषत: प्रौढ, अनुभवी मंडळी सहप्रवाशाची अगत्यानं विचारपूस करतात. स्त्री प्रवाशांना तर ‘सासरी निघाला की माहेरी’ अशी विचारणा करून मॅरिटल स्टेटस आणि शिक्षणासह इतर ‘बायोडेटा’ विचारून घेतात. स्वत:ची माहिती देण्याची तितकीच तत्परता त्यांच्याजवळ असते. पुण्यात विवाहसूचक मंडळांची संख्या दांडगी आहे. त्यांचे ‘मोबाईल ब्यूरोज’ बसमध्ये चालतात असं ऐकिवात आहे.. असो. अशी चौकस मंडळी नाहीशी झाली, त्यानंतर पुण्यात अतिरेकी हल्ल्यांना सुरुवात झाली म्हणतात.
पुणेकर हे मुंबैकरांच्या जोक्सचं गिऱ्हाईक — खरं म्हणजे टार्गेट आहे. संता-बंतांच्या खालोखाल पुणेकर आणि पुणेरी पाटय़ा ही मुंबैकराची टॉप एन्टरटेन्मेंट आहे. पुणेकर तिला प्रत्युत्तर देण्याच्या फंदात पडत नाही. सहिष्णुता अथवा विनोदबुद्धी तल्लख म्हणून नव्हे; मुंबैकर- किंवा एनी अदर ‘कर’ फॉर दॅट मॅटर – पुणेकराच्या खिजगणतीत नसतो. अनुल्लेख ही अधिक झोंबरी, अधिक प्रभावी परतफेड आहे, हे त्याला माहीत आहे. मुंबैकरसुद्धा अजब आहे. ‘पुणे तिथे काय उणे’ची लिस्ट त्याच्यापाशी सदैव तयार असते. मात्र जन्मभर पुणेकराची टिंगल करून अखेर रिटायरमेंटनंतर त्याला पुण्यालाच ‘सेटल’ व्हायचं असतं. ‘रोज दुपारी वरणभात आणि रात्री फोडणीच्या वरणाबरोबर भात खाऊन बंगला बांधणाऱ्या पुणेकराची पु.लं.नी उडवलेली खिल्ली येता-जाता ‘रीपीट’ करीत मुंबैकर हळूच पुण्यात ‘सेकंड होम’ घेतो; ते भाडय़ानं देऊन त्याचं कर्ज फेडतो आणि यथावकाश पुण्यात(च) येतो. पौड-कोथरूड आणि कल्याणीनगर, पुणे-नगर रोड म्हणजे पुण्यातल्या छोटय़ा मुंबईच आहेत. पहिले दोन भाग मधयमवर्गीय आणि दुसरे दोन भाग श्रीमंत मुंबैकरानं फ्लॅट्स घेऊन पुण्यातल्या जागांचे भाव वाढवले म्हणून रेसिडेन्शियल पुणेकर त्याच्यावर नाराज आहे, तर रीअल इस्टेट एजंट खूश आहे.
पुणं शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं, हा लौकिक सार्थच आहे. मात्र त्यात थोडी दुरुस्ती आवश्यक आहे. इथे शिक्षण म्हणजे शिकणं नव्हे, तर दुसऱ्याला शिकवणं! हे कार्य- प्रशिक्षित, व्यावसायिक शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता प्रत्येक पुणेकर त्यात आपापल्या भरीनं भाग घेतो. मनुष्य हा जन्मभराचा अखंड विद्यार्थी आहे आणि पुणेकर जन्मोजन्मीचा शिक्षक आहे. सकल जन मूढ असून, त्यांना शहाणं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, अशी पुणेकराची प्रामाणिक समजूत असते. या ‘कोचिंग’मध्ये पुण्यातले हॉटेलवाले, रसवंत्या आणि रिक्षावाले सहभागी असतात. ‘अन्न टाकू नये’, ‘नळ उघडा टाकू नये’ (तो उघडतच नसेल तर काय? याबद्दल अद्याप मार्गदर्शन उपलब्ध नाही) वगैरे आहारसंहिता सर्वपरिचित आहे. मात्र तिला रसवंतीच्या काव्यमय उपदेशाची सर नाही. रसवंती म्हणजे आजच्या भाषेत शुगरकेन ज्यूस. ‘पेप्सी-थम्सअपचा सुकाळ नव्हता आणि आइस्क्रीम हे बारमाही खाद्य बनलं नव्हतं त्या सहाव्या सातव्या दशकाच्या काळात उसाचा रस हे पुण्याचं हॉट फेव्हरिट कोल्ड्रिंक होतं. उसाचे दांडे आणि नक्षीदार तरटांनी सजवलेल्या आणि कॅलेंडर्सनी खच्चून भरलेल्या एका रसवंतीत मोठं रसाळ आवाहन होतं: ‘देशबंधूंनो, विचार करा! चहापेक्षा रस बरा!’ प्रमोशन आणि मार्केटिंग हा काही आजच्या काळातला शोध नव्हे, हे यावरून सहज पटावं.
दुसऱ्या एका रसवंतीत प्रथमदर्शनीच टळटळीत पाटी होती, ‘नाही देहाचा भरवसा, उधार माल कैसा द्यावा?’, ‘आज रोख उद्या उधार’ या भीतभीत दिलेल्या मिळमिळीत इशाऱ्यापेक्षा हा संतवाङ्मयाला शोभेसा दाखला नाही काय? पुण्यातल्या बहुतेक रिक्षांवर ‘माता-पित्यांचा आशीर्वाद’ किंवा तत्सम कृतज्ञ स्मरणं लिहिलेली असतात. आशीर्वाद माता-पित्यांचा की वायुवेगानं दौडणाऱ्या मीटरचा, असा फजूल प्रश्न विचारायचा नसतो. तुम्ही फक्त उत्तरं द्यायची असतात. ‘सुटे पैसे आहेत का?’ – रिक्षात बसण्यापूर्वीच पहिला नेम धरला जातो. ‘पत्ता बरोबर माहीत आहे ना?’ – हा दुसरा. पत्ता सांगितल्यानंतर तो वर्तमानपत्राचा आहे हे लक्षात आल्यावर तर एकानं मला ‘वर्तमानपत्राचा खप किती’ हा असा अनपेक्षित सवाल केला होता. यानंतर हा आपल्याला पगार विचारणार आणि तो सांगण्याची शोचनीय, लज्जास्पद वगैरे वेळ आपल्यावर येणार म्हणून मी घाबरून म्हटलं, ‘‘तुमचं भाडं देता येईल एवढा नक्कीच आहे.’’ मग काही न विचारता त्यानं मला पत्त्यावर पोचवलं आणि भाडं घेताना म्हटलं, ‘‘आमच्या साईकृपा रिक्षा वाचक मंडळासाठी तुमचा पेपर सप्रेम भेट मिळेल का?’’
‘‘तुमचं वाचनालय आहे?’’ मी आश्चर्यानं विचारलं. ‘‘मग?’’ त्यानं अभिमानदर्शक प्रतिप्रश्न केला, ‘‘भजनी मंडळपण आहे. शाळेतला पोरांना आम्ही वह्य़ापण वाटतो.’’ पुण्यात रात्री आठ-साडेआठनंतर कोणताही रिक्षावाला भाडं नाकारतो, त्याचं कारण उर्मटपणा नसून त्याचं सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक जीवन असतं, असं माझं बौद्धिक घेऊन ते तीन चाकावरचं बहुआयामी व्यक्तिमत्त्व अंतर्धान पावलं. भाषेचा अभिमान ही मूठभर सुशिक्षितांची मिरासदारी नाही, हे सांगणारी पाटीदेखील मग पुण्याच्या एका लॉंड्रीवरच दिसली. फग्र्युसन रोडसारख्या पुण्यातल्या त्या काळच्या हायफाय वस्तीतल्या त्या लाँड्रीवर ठळक, मोठय़ा अक्षरात लिहिलेलं होतं- वसनविशुद्धी वस्त्रालय! पाटीच्या खालच्या कपाटात टांगलेल्या कपडय़ांमुळे तिचा अर्थ माझ्या लक्षात आला.
अशा शिकवण्यांमुळेच पुढे मी बराच काळ मुंबईत राहिले आणि टीव्हीसाठी बरंच काम केलं तरी माझं मराठी बिघडलं नसावं. (किंवा कमी बिघडलंय, म्हणू या हवं तर) ‘मी आलेली तर तू गेलेली’ ही बम्बैया मराठी मला सरावानं कळू लागली, पण तिची सवय लागली नाही. ‘ती गेली असताना पाऊस पडत होता’ हे अप्रतिम काव्य लिहिणारा मुंबैतला नव्हता म्हणून बरं झालं. एरवी ‘ती गेलेली तर पाऊस पडलेला’ असं काव्य वाचावं लागलं असतं. ‘लटपट लटपट तुझं चालणं मोठय़ा नखराचं’ हे लिहिणाऱ्याचा मात्र पुण्याशी नजीकचा संबंध असणार. इतकंच नाही तर हे वर्णन कुण्या मनात भरलेल्या सुंदरीचं नसून पुणेरी सायकलस्वाराचं असणार याविषयी माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. ही लटपट आपल्याला येऊन धडकणार या भीतीनं हे नुसतं वाक्य लिहिताना अंग लटलट थरकतं आहे. या सायकलीची मोठी बहीण- मोटारसायकल म्हणजे तर दोन चाकांवरची यमदूताची स्वारी!
इथेही पुणे-मुंबईत हृदयस्पर्शी साम्य आहे. जागतिकिकरणानंतर पुणे-मुंबईतलं भौगोलिक अंतर कमी झालं आणि सांस्कृतिक, सामाजिक अंतर तर पार पुसून गेलं आहे. सिग्नल पडला की सरळ फुटपाथवर गाडय़ा चढवण्याबाबत दोन्ही शहरातल्या दुचाकीस्वारांचं एकमत आहे. दोन्ही शहरांमधल्या झाडांनी आणि झाडावरच्या पक्ष्यांनी काढता पाय घेतला आहे. दोन्ही शहरांमध्ये आता चंद्र निम्बोणीच्या झाडामागे लपत नाही. काँक्रीट-सिमेंटच्या जंगलात उभ्या राहिलेल्या टॉवर्सनी त्यालाही हुसकून लावलं आहे. बिचारा कुठे तोंड लपवून राहतो, त्यालाच ठाऊक! रिचर्ड ब्रॉन्सनसाहेबांनी म्हणे लवकरच माणसाला चंद्रावर नेणाऱ्या टूर्सचं प्लॅनिंग सुरू केलं आहे. मला खात्री आहे, पुण्या-मुंबईतले बिल्डर्स त्याआधीच चंद्रलोकावर कब्जा करतील.