नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना शेतकर्यांचा अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या. त्याचा शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा देखील झाला असून त्यापैकी सॉईल हेल्थ कार्ड ही महत्वपूर्ण ठरली. शेतीची देखील हेल्थ असते याबद्दल मला माहिती नव्हते. पण त्या योजनेबद्दल मला माहिती झाली. पण त्यानंतर मी राज्यपाल झाल्यावर स्वत:साठी हेल्थ कार्ड तयार केले, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि ॲग्रीव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात आयोजित ‘महा ॲग्रीव्हिजन २०२२’ च्या तिसऱ्या क्षेत्रीय संमेलनाचे उदघाटन कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कृषीमध्ये आधुनिक ज्ञान आणि प्राचीन ज्ञानाचा संगम करून पुढे जाण्याची गरज आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासह दुग्धव्यवसाय आणि शेतीशी निगडित जोडव्यवसायांतील सर्वांगीण ज्ञान प्राप्त करुन काम केल्यास कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनणे शक्य असल्याचेही कोश्यारी यांनी सांगितले.
भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपल्या देशाला एके काळी अमेरिकेतून अन्नधान्य आयात करावे लागत होते. आज आपण कृषी उत्पादनात केवळ स्वयंपूर्ण नसून परदेशात कृषी उत्पादनांचे निर्यात करतो. आपली अन्नधान्याची गरज लक्षात घेता कृषी क्षेत्रात प्रयोग करून अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. आज कृषीनिविष्ठांच्या अतिवापरामुळे शेती नापिक होत आहे.आपल्याला आज शेतीमध्ये नवीन पद्धतीची गरज आवश्यक असून आपल्याला अतिप्राचीन नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे. देशी गाईचे शेण, गोमूत्राचे नैसर्गिक शेतीमध्ये महत्त्व वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.