राज्यसभेची सातवी असुरक्षित जागा मला नको, मला सहावी जागा हवी आहे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली. सातव्या जागेसाठी मनोहर जोशी त्यासाठी उत्सुक असतील व अतिरिक्त खासदार निवडून येणार असेल, तर ती त्यांना द्या, असेही ते म्हणाले.
आठवले म्हणाले, की राज्यसभा देण्याची जबाबदारी राज्यातील सेना-भाजप नेत्यांची आहे. शिवसेनेला रिपब्लिकन पक्षाचा फायदा होत असेल, तर रिपब्लिकन पक्षालाही फायदा मिळाला पाहिजे. मिलिंद नार्वेकरांशी आपली नुकतीच भेट झाली. त्यानुसार उद्धव ठाकरे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी राज्यसभेविषयी चर्चा करणार आहेत. ते झाल्यानंतर महिनाभरात लोकसभेच्या जागांबाबत ठरविण्यात येईल.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा व पुणे या जागांची आमची मागणी आहे. सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर उभे राहावे, असे आवाहन आम्ही केले आहे. त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेणार आहे. लोकसभेच्या तीन व राज्यसभेची एक जागा देण्याबाबत उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांनी प्राथमिक चर्चेत मान्य केले आहे. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी भीमशक्तीला सोबत ठेवावेच लागेल. दुर्लक्षित केले, तर सत्ता मिळणार नाही.
इंदू मिलच्या जागेत डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन पाच डिसेंबरला करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे, असे सांगून ते म्हणाले, की तसे झाले नाही तर सहा डिसेंबरला कार्यकर्त्यांसह मिलमध्ये शिरून आम्ही भूमिपूजन करू.