भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागलेले देवेंद्र फडणवीस हे आगामी निवडणूक पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस लढले तर मला आनंदच होईल, असे खासदार गिरीश बापट यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. त्यामुळे खासदार गिरीश बापट यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी दिल्यास मला कोणताही आक्षेप नाही, असे बापट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
संघटनांनी योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यावा –
बापट म्हणाले, “उमदेवारी कोणाला द्यायची याचा निर्णय प्रमुख नेते घेतात. त्यासाठी एक यंत्रणा असते, अध्यक्ष असतात, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवू लागल्या तर पेच निर्माण होऊ शकतो. अशा संघटनांनी योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यावा. पण, देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला कोणतीही अडचण नाही. उलट फडणवीस पुण्यातून उभे राहिल्यास मला आनंदच होईल.”