पुणे : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने नाकारत,महायुतीच्या हाती सत्ता दिली. त्यानंतर येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामध्ये काँग्रेस पक्ष देखील जोमाने कामाला लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात विधानसभा मतदार संघ निहाय प्रमुख नेत्यांच्या नियुक्तया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कसबा मतदार संघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्याने, ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याच दरम्यान रविंद्र धंगेकर यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍सवर एक फोटो ठेवला, त्यामध्ये गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं आहे. राजा हरला काय, राजा जिंकला काय, हा राजा असतो, निष्ठेत तडजोड नाही! आशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. तर चार दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांची रविंद्र धंगेकर भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो उदय सामंत यांनी ट्विट केले होते. त्यामुळे मिशन टायगर अंतर्गत रविंद्र धंगेकर यांचा शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली.

या एकूणच पक्ष प्रवेशाबाबत रविंद्र धंगेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “माझे सर्व पक्षात मित्र आहे. माझ्या सर्वाशी गाठीभेटी सुरू असतात. येणं जाणं होत, त्याप्रमाणेच चार दिवसांपूर्वी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त माझी उदय सामंत यांच्याशी भेट झाली होती आणि त्या भेटीचे फोटो समोर आले. त्यावरुन अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. पण आमच्या दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. उदय सामंत हे माझे जुने मित्र आहे.आमची सहज भेट झाली असून यापुर्वी मी एकनाथ शिंदे,अजित पवार यांना देखील भेटलो आहे. यामुळे उदय सामंत यांच्या भेटीमुळे कोणताही राजकीय वेगळा अर्थ काढू नये अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले,सोशल मीडिया माझा जो फोटो व्हायरल होत आहे. तो शिवजयंतीमधील आहे.तो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, त्यामध्ये काहीही गैर नाही.तसेच मी काँग्रेसमध्येच आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान असून द्वेष करण आपल्याला जमत नाही. पण मागील काही दिवसात राजकीय वर्तुळात जे काही सुरू आहे. त्याबाबत मी येत्या दोन दिवसात माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.