पिंपरी-चिंचवडचा समावेश ‘स्मार्ट सिटी’त असावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असून अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, एलबीटी, शेतकऱ्यांचा परतावा, विकास आराखडय़ातील रस्ते आदींसाठी एकत्रित प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी शुक्रवारी एकत्रितपणे दिली. एकीकडे मोठमोठय़ा कंपन्या बंद पडत असताना गुन्हेगारी घटना प्रचंड वाढल्याने उद्योगनगरी गुन्हेगारांचे शहर होते की काय, याकडे चाबुकस्वारांनी लक्ष वेधले.
पिंपरी पत्रकार संघाच्या वार्तालापात लक्ष्मण जगताप, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे सहभागी झाले, तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयंत जाधव होते. जगताप म्हणाले,की यापूर्वीच्या सरकारच्या कुचकामी धोरणामुळे बांधकामांचा प्रश्न जटिल झाला, तो लवकरच सोडवू. ४० वर्षांत चिंचवडमधील एकही पेठ विकसित होऊ शकली नाही. वेळीच कार्यवाही झाली असती तर एकही घर अनधिकृत नसते आणि सर्व गरजूंना घरे मिळाली असती.चाबुकस्वार म्हणाले,की मोठय़ा कंपन्या शहराबाहेर जात आहेत, त्या थोपवण्याची गरज आहे. एमआयडीसीच्या जागांवर झोपडपट्टय़ा उभ्या आहेत, त्यांचे विकसकांकडून पुनर्वसन करण्याचा व त्यासाठी दहा वर्षांचा बृहत आराखडा करण्याचा विचार आहे. यशवंतराव चव्हाण रूग्णालयाची क्षमता वाढवू व बर्न वॉर्ड सुरू करू. लांडगे म्हणाले,की नागरिकांना अपेक्षित असलेली कामे व्हायला हवीत. बीआरटीविषयी ८० टक्के नागरिक विरोधात बोलतील. स्मार्ट सिटीचा विचार करतानाच नागरिकांच्या अपेक्षांचा व सूचनांचाही विचार व्हावा. आपल्याकडून चुकीचे निर्णय होऊ नयेत. औद्योगिक क्षेत्रात जाचक अटी असल्याने उद्योजक बाहेर जात आहेत. पिंपरी-चिंचवडचा एकतरी खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळावा, अशी अनेक वर्षांपासून तीव्र इच्छा आहे.

गुजरातच्या धर्तीवर इंद्रायणी, पवनेसाठी प्रकल्प
भाजपकडून मंत्रीपद मिळेल, असे संकेत मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी स्वत:च या कार्यक्रमात दिले. मुंबईतील एमएमआरडीएच्या धर्तीवर पुणे-पिंपरीतील सर्व संस्था एकत्रित करण्याची गरज आहे. गुजरातमधील साबरमतीच्या धर्तीवर इंद्रायणी, पवना नदीचा प्रकल्पासाठी विचार व्हावा, नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader