पुणे : ‘मी पँथरमध्ये परत यावे, अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, योग्य वेळ येत नाही, तोपर्यंत मी येणार नाही. आलोच, तर अनेकांना घेऊन येईल,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.
हर्मिस प्रकाशनच्या ॲड. जयदेव गायकवाड लिखित ‘दलित पँथर्सचा झंझावात’ या पुस्तकाचे प्रकाशन आठवले आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आठवले बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे, उपराकार लक्ष्मण माने, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, डॉ. मनोहर जाधव, विजय जाधव, दिलीप जगताप आणि सुरेश केदारे यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी पँथर चळवळीत लढलेल्या ज्येष्ठ पँथर्सचा सन्मान करण्यात आला.
आठवले म्हणाले, ‘लोकसहभागात वेगवेगळे विचार असतात. त्यातील सर्वांचेच विचार सर्वांना पटतात असे नाही. मला देखील भाजपचा सर्व अजेंडा मान्य असतो असे नाही. मी पुन्हा दलित पँथर स्थापन करावी, पँथरमध्ये यावे अशी अनेकांची मागणी आहे. मात्र, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी चळवळीत असताना होणारी आंदोलने आता होतील, अशी परिस्थिती नाही. आता चळवळीत सर्वांनी एकत्रित यावे.
‘अर्जुन डांगळे यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे.’ अशी इच्छाही आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.
एकत्रित लढा देण्याची वेळ
‘आंबेडकरी चळवळी मोडीत काढण्यासाठी एकमेकांमध्ये विभाजन सुरू करण्याचे प्रयत्न होताना दिसून येतात. शोषित, वंचित यांची आणखी विभागणी केली जात आहे. त्यामुळे, आपल्यासमोर बाका प्रसंग असून एकत्रित येऊन लढा द्यायची वेळ आली आहे. पँथरमध्ये केवळ बिबटे वाढवून चालणार नाही, तर कडवट झुंज द्यावी लागेल. सर्वांनी मिळून संकटांना सामोरे गेले पाहिजे. एकत्रित लढा उभारल्यास नक्कीच तात्पुरता झंझावात शमेल आणि दीर्घकालीन परिणाम दिसेल, असे मत डाॅ. आढाव यांनी व्यक्त केले.