पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र, ‘ही भेट राजकीय नसून मैत्रीपूर्ण होती. त्यामुळे आमची भेट झाली असली तरी माझा आढळराव पाटील यांना विरोध कायम आहे’, अशी भूमिका दिलीप मोहिते यांनी बोलून दाखविली.
हेही वाचा – नीटच्या अर्जांसाठी मुदतवाढ; कधीपर्यंत करता येणार अर्ज?
हेही वाचा – मावळमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, महायुतीत अद्यापही अनिश्चितता
खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिलीप मोहिते पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोहिते यांच्यासमवेत झालेल्या भेटीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. या पार्श्वभूमीवर दिलीप मोहिते म्हणाले, की शिवाजीराव आढळराव पाटील आणि माझे मतेभद अगदी टोकाचे आहेत. शिवाजीराव मला उमेदवार म्हणून भेटीला आलेले नाहीत. निवडणुकीला मला मदत करा असेही ते म्हणालेले नाहीत. आता उमेदवारी मिळेल अशी शक्यता असल्याने त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर पुणे जिल्ह्यात उमेदवारीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार दिलीप वळसे पाटील यांना आहेत. त्यामुळे एखाद्याला उमेदवारी देण्याअगोदर त्याने पक्षात राहून काम करणे गरजेचे आहे. ऐनवेळी उमेदवार उभा केला तर निवडून येत नाही. याबाबत मला पक्षाकडून सतत डावलण्यात आले आहे. पक्षाने मला आढळराव यांचा प्रचार करण्यास सांगितले तर मी राजकारण सोडून घरी बसेन.