निवडणुकांच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वाधिक महत्त्वाचे असलेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा तसेच शास्तीकराचा विषय आचारसंहिता उठल्यानंतर मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. मावळ-शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, असे त्यांनी बजावून सांगितले. या बैठकीत आमदार विलास लांडे व नगरसेवक दत्ता साने यांच्यात खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.
मावळ-शिरूरमध्ये ठाण मांडून बसण्याची घोषणा अजितदादांनी यापूर्वीच केली होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील प्रचार थंडावल्यानंतर ते या ठिकाणी दाखल झाले. मावळचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यासाठी काल कामशेत व दापोडीत त्यांनी जाहीर सभा घेतली. गुरुवारी सकाळीच देवदत्त निकम यांच्यासाठी त्यांनी रुपीनगरला नगरसेवकांची बैठक घेतली. नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदार लांडे, महापौर मोहिनी लांडे, पक्षनेते मंगला कदम यांच्यासह भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक कार्यकर्त्यांने आपापल्या भागातले मतदान करवून घ्या, अधिकाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी केली. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गेल्या १० वर्षांत काम केले नाही. आपण कामे करतो, ती जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, त्याचा फटका बसतो, असे सांगत विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे ते म्हणाले. नगरसेवकांनी रेडझोन, अनधिकृत बांधकामे व शास्तीकरासारखे महत्त्वाचे विषय प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. ती कामे करायची आहेत, प्रक्रियाही सुरू झाली आहे. आचारसंहिता झाल्यानंतर ते विषय मार्गी लागतील. त्यासाठी खासदार निवडून आणा, त्या खासदारांकडून दिल्लीतील कामे करून घेता येतील, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा