‘‘माझी कोणतीही चूक नसताना, माझ्यावर अन्यायकारक, खोटे आणि निराधार आरोप होत राहिल्यास मला सत्य प्रकाशात आणावे लागेल,’’ असा इशारा पुणे विद्यापीठाच्या माजी परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांनी दिला आहे. कुलगुरूंचा आदर ठवूनच आजपर्यंत संयम बाळगून आहे. माझ्याबद्दल वैयक्तिक आणि माझ्या कामाच्या अनुषंगाने कुलगुरूंनी केलेली विधाने धक्कादायक आहेत,’ असेही जोशी यांनी म्हटले आहे.
‘काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या परीक्षा निकालांमधील घोळाच्या मुद्दय़ावरून काही संघटनांनी संपदा जोशी यांना हटवण्याची मागणी करत आंदोलने केली होती. पण त्यांना हटवण्याचा निर्णय मी घेतला नाही. त्यांना रजेवर जायचे होते म्हणून त्यांनी तसा अर्ज केला. कौशल्य विकसन विभागाच्या संचालकपदी काम करण्यात आपल्याला रस असल्याचे जोशी यांनी सांगितल्यामुळे त्यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली. परीक्षा विभागात परतायचे की नाही हा निर्णयही जोशी यांनीच घ्यायचा आहे,’ असे विधान कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शुक्रवारी केले होते. त्याबाबत डॉ. जोशी यांनी म्हटले आहे, ‘‘कुलगुरूंच्या आदेशावरून आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी चर्चा करूनच कौशल्य विकास केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार मी स्वीकारला. जो विभाग विद्यापीठात अस्तित्वातच नाही त्याचा कार्यभार स्वीकारणे ही विद्यापीठाच्या लौकिकाला बाधा पोहचू नये म्हणून केलेली तडजोड होती. मी कुलगुरूंच्या संमतीने परीक्षा विभागामध्ये विविध पातळ्यांवर सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील होते. माझ्याकडून कोणत्याही प्रकारे चुका, टाळाटाळ, दुर्लक्ष झालेले नाही. त्याबाबत व्यवस्थापन परिषदेने माझ्या अभिनंदनाचा ठरावही केला होता. माझ्यावर खोटे आरोप झाल्यास मला सर्वासमोर सत्य आणावे लागेल. विद्यापीठाच्या लौकिकाचा विचार करून आणि कुलगुरूंचा आदर ठेवून आजपर्यंत संयम बाळगून आहे. या पाश्र्वभूमीवर कुलगुरूंनी माझ्याबद्दल जी विधाने केली त्याचा खेद वाटला.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा