‘मला मराठी भाषा खूप आवडते, आणि बोलताही येते,’ असे म्हणत प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर याने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. इतकेच नव्हे, तर मराठीवरील प्रेम व्यक्त करताना त्याने चक्क ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ हे बालगीत गुणगुणून दाखवले!  
कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या ‘२४’ या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी अनिल पुण्यात आला होता. या वेळी त्याने पत्रकारांशी संवाद साधला.
मालिकेविषयी बोलताना अनिल म्हणाला, ‘‘छोटय़ा पडद्यावर काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आणि चांगला आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी या मालिकेच्या निर्मितीच्या प्रयत्नात होतो. अनेक अडचणींनंतर अखेर ती पडद्यावर येऊ शकली. परंतु तिला प्रेक्षकांकडून, विशेषत: तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद खूप समाधानकारक आहे. सध्या या मालिकेच्या शेवटच्या भागांचे चित्रीकरण सुरू असून त्यानंतर ती डीव्हीडी स्वरूपातही येऊ शकेल. काही काळानंतर या मालिकेचे द्वितीय पर्व आणण्याचा विचार आहे.’’  
 आपली मुलगी अभिनेत्री सोनम कपूर हिच्यासाठी चित्रपट निर्मिती करण्यास उत्सुक असून त्यासाठी अनेक कथा डोळ्यासमोर असल्याचे अनिलने सांगितले. तो म्हणाला, ‘‘भविष्यात दिग्दर्शन करायलाही मला आवडेल. दिग्दर्शन करतानाही अभिनयासाठी सर्वात आधी सोनमलाच विचारेन. तिने नाही म्हटले तर मात्र तिचे काही खरे नाही! पण मग मला नाइलाजास्तव इतर कुणाचा तरी विचार करावा लागेल.’’
‘तेजाब’ आणि ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटांना पंचवीस वर्षे झाल्यानंतर त्यांचे सिक्वेल येत आहेत. या सिक्वेलमध्ये काम करायला आवडेल का, या प्रश्नावर अनिल म्हणाला, ‘‘ही पंचवीस वर्षे कशी गेली तेच कळले नाही. एखादा चित्रपट केल्यानंतर मी त्याच चित्रपटाचा विचार करत बसत नाही. पुढे काम करत राहतो. आपण नेत्यासारखे पुढे व्हावे आणि इतरांनी आपल्यामागून यावे, अशी ही भावना आहे.’’