एफटीआयआयमधील वेगवेगळ्या वादग्रस्त विषयांसंदर्भात सर्व संबंधितांशी अत्यंत मोकळ्या वातावरणात आणि समाधानकारक चर्चा झाली असून, सोमवारी आमची समिती आपला अहवाल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे सुपूर्द करेल, असे या समितीचे सदस्य एस. एम. खान यांनी शुक्रवारी सांगितले. खान यांच्यासह तीन सदस्यीय केंद्रीय समितीने एफटीआयआयमधील वादासंदर्भात तेथील प्राध्यापक, कर्मचारी आणि संपकरी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असलेल्या विद्यार्थ्यांनीही या चर्चेबद्दल समाधान व्यक्त केले. संपाच्या ७१ दिवसानंतर का होईना आमची बाजू ऐकून घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
केंद्रीय समितीमध्ये रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर इंडियाचे एस. एम. खान, माहिती व प्रसारण विभागाचे सहसचिव एस. नागनाथन आणि चित्रपट विभागाचे संचालक अन्शु शुक्ला यांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास समितीचे सदस्य एफटीआयआयच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास पहिल्या बैठकीला सुरुवात झाली. बैठकीच्या शेवटच्या सत्रामध्ये सदस्यांनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांशी सुमारे दोन तास संवाद साधला.
आमचा लढा एका व्यक्तीविरोधात नसून, संस्थेतील निवड प्रक्रियेविरोधात आहे. आम्ही आमची बाजू समितीच्या सदस्यांपुढे मांडली आहे. आता ते काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष आहे, असे संपावर असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे देशातील या प्रतिष्ठेच्या संस्थेचे दैनंदिन कामकाज बंद पडले आहे.

Story img Loader