रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रक्तपिशव्यांमधील रक्तात एचआयव्ही, हिपेटायटिस ‘बी’ किंवा हिपेटायटिस ‘सी’ या विषाणूंचा संसर्ग आहे का, हे आधुनिक तंत्राने ओळखणाऱ्या ‘नॅट’ रक्ततपासणीतील आणखी पुढची ‘आयडी नॅट’ (इंडिव्हिज्युअल डोनर न्यूक्लिक अॅसिड टेस्टिंग) ही रक्तचाचणी फेब्रुवारीपासून पुण्यात केईएम रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. ही विशिष्ट चाचणी करणारे पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिलेच केंद्र असल्याचा दावा रुग्णालयाच्या रक्तपेढी व्यवस्थापकांनी केला आहे.
एचआयव्ही, हिपेटायटिस बी आणि हिपेटायटिस सी हे विषाणू शरीरात शिरल्यानंतर ते रक्तचाचणीत दिसून येण्यादरम्यान काही दिवसांचा वेळ जातो. याला वैद्यकीय भाषेत ‘विंडो पिरियड’ म्हणतात. हा विंडो पिरियड नॅट चाचणीत कमी होतो. नॅट चाचणीचे ‘मिनिपूल नॅट’ आणि ‘आयडी नॅट’ असे दोन प्रकार असून यातली आयडी नॅट चाचणी अधिक आधुनिक समजली जाते.
केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले, ‘विषाणू शरीरात शिरल्यानंतर त्याने निर्माण केलेल्या ‘अँटीबॉडी’ची चाचणी एलायझा चाचणीत केली जाते. तर नॅट चाचणीत नेमका विषाणू पकडून त्यातील ‘डीएनए’ किंवा ‘आरएनए’ वाढवून त्याआधारे चाचणी केली जाते. ‘मिनिपूल नॅट’मध्ये रक्ताच्या ६ नमुन्यांमधील ‘प्लाझमा’ रक्तघटक एकत्र करून चाचणी केली जाते. यात एकाही रक्तनमुन्यात विषाणू सापडला तर सर्व नमुने पुन्हा स्वतंत्रपणे तिन्ही विषाणूंसाठी तपासावे लागतात आणि जोपर्यंत विषाणूसंसर्गित रक्तपिशवी सापडत नाही, तोपर्यंत इतर रक्तपिशव्याही रुग्णांना देता येत नाहीत. प्लाझमाचे सहा नमुने चाचणीसाठी मिसळल्यानंतर विषाणूची तीव्रता (व्हायरल लोड) कमी पडल्यास संसर्गाचे निदान न होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आयडी नॅट चाचणीत रक्ताचा प्रत्येक नमुना स्वतंत्रपणे तपासला जात असून त्यात विषाणूंचा विंडो पिरियड आणखी कमी होतो.’
‘ विंडो पिरियड’मधला फरक
एलायझा चाचणी व आयडी नॅट चाचणीतील विंडो पिरियडचा फरक असा –
विषाणू एलायझा चाचणीतील नॅट चाचणीतील
एचआयव्ही १४ दिवस ४.७ दिवस
हिपेटायटिस ‘बी’ ३८ दिवस १४ दिवस
हिपेटायटिस ‘सी’ ५३ दिवस २.२ दिवस
चाचणी खर्चिक!
सध्या विषाणूसंसर्गाचे निदान करणारी ‘एलायझा’ ही चाचणी रक्तपेढय़ांना बंधनकारक असून नॅट चाचणी खर्चिक असल्याने ती बंधनकारक नाही. ‘आयडी नॅट’ चाचणीसाठी अंदाजे एक हजार रुपये खर्च येतो. डॉ. चाफेकर म्हणाले,‘आम्ही प्रत्येक रक्तपिशवीसाठी एलायझा व आयडी नॅट या दोन्ही चाचण्या करणार आहोत. नॅट चाचणीसाठी येणाऱ्या खर्चाचा ६० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या शुल्कात व ४० टक्के भाग प्लाझमा व प्लेटलेट्स या रक्तघटकांच्या शुल्कात विभागून वाढवला जाईल.’
‘आयडी नॅट’ रक्तचाचणी आता पुण्यातही!
रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रक्तपिशव्यांमधील रक्तात एचआयव्ही, हिपेटायटिस ‘बी’ किंवा हिपेटायटिस ‘सी’ या विषाणूंचा संसर्ग आहे का...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-12-2015 at 03:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Id nat blood test pune now center kem