समाजातील सध्याची स्थिती लक्षात घेता आदर्श माता-पिता यांचाच नव्हे, तर आदर्श पुत्रांचाही सन्मान होणे गरजेचे आहे. त्यातून समाजाला प्रेरणा मिळेल, असे मत संत साहित्याचे अभ्यासक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून विश्वमाता फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय विश्वमाता व आदर्श माता गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोरे बोलत होते. गृहराज्यमंत्री राम शिंदे, विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, तसेच भाग्यश्री दांगट, बाळासाहेब पाटील, गणेश शिंदे व फाउंडेशनचे संस्थापक शिवाजी घाडगे त्या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातील ५१ आदर्श मातांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. मोरे म्हणाले,‘आई- वडिलांचे महत्त्व मोठे आहे. खरे तीर्थ त्यांच्यातच आहे, त्यामुळे आपल्याला तीर्थ मिळविण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात हेच म्हटले आहे. सध्या आदर्श पुत्रांच्याही सन्मानाची गरज आहे. तुम्ही परदेशी जा, मोठे व्हा व देशाच्या उत्पन्नात भर टाका. पण, आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू नका.’
शिंदे म्हणाले,‘ सामाजिक प्रेरणा देणाऱ्या चांगल्या व्यक्तींची संख्या सध्या घटते आहे. ही संख्या वाढण्याची आवश्यकता आहे. आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. मात्र, ठराविक काळापर्यंतच हा संघर्ष असतो. आदर्श मातांना पुरस्कार देण्याचा हा उपक्रम योग्य आहे. त्यातून प्रेरणा निर्माण होतील.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा