निवृत्तीनंतर शांत, निवांत आयुष्य जगता यावे.. यासाठी पुण्याकडे पावले वळायची. पेन्शनरांचे शहर अशी ओळख पुण्याची झाली होती. मात्र, आता आलिशान. आणि श्रीमंती गृहप्रकल्पांचे शहर. अशी पुण्याची ओळख बनू पाहात आहे. पुण्याच्या परिसरात अशा अनेक मोठय़ा प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे.
गेल्या काही वर्षांत पुण्याने औद्योगिक क्षेत्रात आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याने ओळख निर्माण केली. त्यानंतर पेन्शनरांचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात बांधकाम व्यवसायाने मोठी उंची गाठली. आता आलिशान गृहप्रकल्पांचे शहर अशी पुण्याची ओळख होऊ पाहात आहे. पुण्याच्या परिसरात अनेक मोठे आलिशान गृहप्रकल्प उभे राहात आहेत. हिंजवडी, एनआयबीएम, कोंढवा, तळेगाव, चऱ्होली या भागांत हे प्रकल्प साकारले जात आहेत. जिम, क्लबहाऊस, अ‍ॅम्फीथिएटर या नेहमीच्याच सुविधांबरोबरच आता या प्रकल्पांमुळे गोल्फ कोर्ट, प्रत्येक सदनिकेत जलतरण तलाव, कॅम्पिंग साईट अशा सुविधांचा ट्रेंड रुजू पाहात आहे. प्रकल्पाच्या परिसरात कॅम्पसाठी छोटे जंगल तयार करणे, नदीकाठच्या प्रकल्पांजवळ मासेमारीसाठी खास जागेची निर्मिती करणे. अशा क्लृप्त्या ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी व्यावसायिकांकडून राबवण्यात येत आहेत. किमान ७० लाख रुपयांपासून पुढे अगदी काही कोटी रुपयांत किंमत असलेले हे प्रकल्प आहेत. ट्रम्फ टॉवरनंतर आता बांधकाम क्षेत्रात जगात नाव कमावलेली ‘अदास’ कंपनीचे नावही आता पुण्यात रुजत आहे. साहजिकच अनेक सिनेकलावंत, उद्योजक आता पुणेकर होणार आहेत.
मंदीच्या वातावरणातही मोठय़ा प्रकल्पांचा शुभारंभ
प्राईड ग्रुपतर्फे चऱ्होलीजवळ ४०० एकर परिसरात ‘प्राईड वर्ल्ड सिटी’ हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल ६५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याची घोषणा नुकतीच या ग्रुपचे कार्यकारी संचालक अरविंद जैन यांनी केली. याचबरोबर बाणेर परिसरात पिनॅकल ग्रुपचा नीलांचल, पिरंगुट जवळील कासार-आंबोली येथे अचलारे रिअल्टर्सचा ‘हनीडय़ू’ प्रकल्प उभा राहात आहे. विशेष म्हणजे सध्या बांधकाम क्षेत्रावर मंदीचे सावट असतानाही हे प्रकल्प पुण्यात उभे राहत आहेत.

Story img Loader