जेजुरी : जेजुरी एमआयडीसी मधील उद्योजकांना कोणी काही कारणावरून त्रास दिल्यास, दमदाटी केल्यास कोणतीही भीती न बाळगता त्वरित जेजुरी पोलीस स्टेशनशी किंवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी जेजुरी येथे केले . माझा फोन २४ तास सुरू असतो असेही त्यांनी सांगितले.

जेजुरी एमआयडीसीमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस अधिकारी व उद्योजक यांच्या बैठकीचे जिमा हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. बैठकीसाठी जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील , जीमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे ,उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, रवी जोशी, शकील शेख, अनंत देशमुख ,माजी अध्यक्ष प्रकाश खाडे, महावितरणचे संदीप काकडे, एमआयडीसीचे अधिकारी व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औद्योगिक वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळी उभ्या राहणाऱ्या कंटेनर व इतर वाहनातून होणाऱ्या डिझेल चोऱ्या, रात्रीच्या वेळी रस्त्यात कामगारांची होणारी लुटमार, विद्युत मंडळाच्या बॉक्समधील चोऱ्या , दारू पिणाऱ्यांचा त्रास व इतर भुरट्या चोऱ्या याबाबत उद्योजकांनी अडचणी मांडल्या. रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास वेळ न दवडता तातडीने पोलिसांना कॉल करा, आपला कॉल आल्यावर लगेचच पोलीस त्या ठिकाणी पोहोचतील. सीसीटीव्ही फुटेज चेक करून, नाकाबंदी करून आरोपी पकडणे सोपे होते. पोलिसांची रोज रात्री एमआयडीसीमध्ये गस्त घालण्यासाठी गाडी येत असते. या परिसरात आवश्यक तेथे सर्वत्र उजेड व कॅमेरे असावे असे श्री .बरडे यांनी सांगितले.

उद्योजकांच्या जीमा संघटनेचे अध्यक्ष डॉ .रामदास कुटे यांनी जेजुरी एमआयडीसी मधील सर्व कंपन्यामधील कामगार हे ९०% स्थानिक आहेत. याबाबत कोणाचे काही म्हणणे असल्यास चर्चा करून प्रश्न सोडवता येतील. जिमा व कामगारांची जिसा संघटना आजपर्यंत एकत्रच काम करत आहेत. उद्योग व्यवस्थित चालले तरच रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होती हे शासनाचे धोरण आहे. जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या गाड्या उभ्या करण्यासाठी एमआयडीसी ने आम्हाला अद्यापही ट्रक टर्मिनलसाठी प्लॉट दिलेला नाही, आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या काम सुरू आहे. कंपनीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या मोठ्या गाड्यांना मालवाहतूक करताना अडचण येण्याची शक्यता आहे यासाठी पीडब्ल्यूडी, एमआयडीसी व पोलीस प्रशासन यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरच्या ठेकेदारांना काम

जेजुरी औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांमध्ये कामगारांची पिळवणूक होत असून स्थानिक कामगार व भूमिपुत्रांना डावलले जात आहे. स्थानिकांना डावलून बाहेरच्या ठेकेदारांना विविध सेवा पुरवण्याचे काम दिले जाते . कंपनीत काम करणाऱ्या महिलांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत, ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या घरातील तरुणांना नोकऱ्या दिल्या नाहीत अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार. -संदीप जगताप (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड व जीसा संघटना)