पुणे : मागील आठवड्यात पुणे शहर आणि जिल्हय़ात जोरदार पाऊस झाल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तर रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यामुळे पावसाळया पूर्वीची काम करण्यात आल्याचा दावा प्रशासनाचा फोल ठरला. त्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज, सिंहगड रोड परिसरातील नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरी जाऊन पाहणी केली आणि प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेतली.त्या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.

त्यानंतर प्रसार माध्यमांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की,पावसाचे पाणी जाऊन ज्या घराचे नुकसान झाले आहे.त्या ठिकाणी जाऊन मी पाहणी केली आहे.तेथील नागरिकांकडून माहिती घेतल्यावर अनेक ठिकाणी नाल्यावर रस्ते करण्यात आले आहे.तर काही ठिकाणी नाले वळविण्यात आले आहे. यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले आहे. या सर्व चुकीच्या कामांना प्रोत्साहन देणार्‍या अधिकार्‍यांवर आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी,तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना महापालिका प्रशासनामार्फत तातडीने मदत देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून एकाची हत्या; मेहुण्यासमोर घडला थरार

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, पुणे शहरातील सध्याची एकूणच परिस्थितीत लक्षात घेतल्यावर राज्य सरकारने पुणे शहराकडे लक्ष घालावे,यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करणार आहे.तसेच येत्या आठ दिवसात शहरातील नाले सफाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाला त्यांनी यावेळी दिला.