पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे मत
बँकांमार्फत आर्थिक व्यवहार केल्यास काळ्या पैशांच्या व्यवहाराला आळा बसेल. परदेशात स्वत:सोबत पैसे न घेता जोखीमविरहित आर्थिक व्यवहार आरटीजीएस, डेबीट, क्रेडीट कार्ड व नेट बँकींग या सुविधांच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे आर्थिक सुरक्षिततादेखील मिळते, असे मत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी व्यक्त केले.
लाईफ ( लाईक माईंडेड इनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेंट) संस्था आणि अर्थक्रांती जनसंसदतर्फे धुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, चंद्रकांत भरेकर, वैशाली दांगट आणि जालना जिल्ह्य़ातील पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना ‘लाईफ स्फूर्ती सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सोपान पवार, प्रभाकर कोंढाळकर, पोपटराव कटके, ओंकार कोंढाळकर, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे, समीर इंदलकर, सम्राट करवा आदी या वेळी उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, की परदेशात आर्थिक साक्षरता आहे, मात्र आपल्या देशात आर्थिक साक्षरतेला तितकेसे महत्त्व दिले जात नाही. बँकांमार्फत आर्थिक व्यवहार केल्यास काळ्या पैशांच्या व्यवहाराला आळा बसेल. विविध गुन्हय़ांना आळा घालण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना राज्यात राबविण्यात आली आहे. ‘पोलीस मित्र अॅप’च्या माध्यमातून राज्यभरात दोन लाख पोलीस मित्र जोडले गेले आहेत. प्रतिसाद मोबाईल अॅपच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी सोडविणे तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात येत आहेत. सत्काराला उत्तर देताना चैत्राम पवार म्हणाले, की गावासाठी काहीतरी करायचे या माध्यमातून आम्ही वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला. वनवासी कल्याण आश्रमासाठी जोडलो गेल्यानंतर आदिवासींसाठी काम करण्याची संधी मिळाली. ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून कामे हाती घेण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा विचार क रून ८५ गावांमध्ये धूरविरहित ( स्मोकलेस) चूल उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ओंकार कोंढाळकर यांनी प्रास्ताविक केले, तर मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा