लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : मी गृहमंत्री आणि सरकारचा एकही डाव यशस्वी होऊ दिला नाही. आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. मला बाजूला करण्यासाठी गृहमंत्र्यांनी अनेक प्रयत्न करूनही मी बाजूला झालो नाही. सध्या महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमिष दाखवून माणसे फोडली जात आहेत. विनाकारण महिलांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे सर्व सरकारला जड जाईल. सहा जूनपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास विधानसभा काबीज करणार आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
जरांगे पाटील रविवारी पुणे, पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पिंपरी- चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावी अशी आमची मागणी आहे. आंदोलक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेतले. त्यावर शासनाने अधिसूचना काढली. पण, अंमलबजावणी केली नाही, येथे धोका झाल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा-मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी… कुठे आणि कधी असणार सुट्टी?
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमचा संपर्क नाही. परंतु, आमची मने एक आहेत. दोन मन होऊ शकत नाही. कोणाला निवडून आणायचे हे समाज ठरवेल. पण एक लक्षात ठेवा, आई बहिणीच्या अंगावरील व्रण समाजाने विसरू नये. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यांनी मराठा समाजाला काही दिलेले नाही. जो सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्याच्या बाजूने रहावे, असेही जरांगे पाटील म्हणाले.