महिला मतदारांचे मत
भक्ती बिसुरे, पुणे</strong>
लोकसभा निवडणुका उंबरठय़ावर येऊन ठेपल्याने सर्वत्र प्रचार सभा, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठी घेणारे उमेदवार असे चित्र दिसत आहे. सर्वसाधारणपणे पक्ष, जात, धर्म या निकषांकडे पाहून मतदान करण्याची मानसिकता मतदारांमध्ये दिसत असली तरी बदलत्या काळाबरोबर या मानसिकतेत देखील बदल होताना दिसत आहे. प्रसार माध्यमांतून मिळणाऱ्या बातम्या, समाजमाध्यमांतून दिसणारी उमेदवारांची प्रतिमा, त्यांचे काम, विचारशैली या गोष्टींचा मतदारांच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यातून साहजिकच मतदार अधिक प्रगल्भ आणि विचारी होताना दिसत आहे. शहरातील महिला मतदारांना निवडणुकीबद्दल काय वाटते, राजकारणाबाबत त्यांचे मत काय, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या काय, त्या किती प्रमाणात सुटल्या, येत्या काळात त्या सुटतील अशी अपेक्षा त्यांना वाटते का, उमेदवाराबद्दल त्यांचे निकष काय अशा विषयांवर ‘लोकसत्ता’ने महिला मतदारांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.
उमेदवार सुशिक्षितच हवा
पक्ष, जात, धर्म यांच्या पलीकडे जाऊन आपला उमेदवार सुशिक्षितच हवा. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मी शैक्षणिक पात्रता उत्तम असलेल्या प्रतिनिधीला मत देणे पसंत करते. स्मार्ट सिटीसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रभावापेक्षा शिक्षण, वीज, पाणी, रस्ते या प्राथमिक सुविधांना प्राधान्य दिले जावे. सरकारने आपले काम पारदर्शकपणे, भ्रष्टाचार न करता पार पाडले तर गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित ही दरी राहाणार नाही. नवीन पिढीतील उमेदवार राजकारणातून मिळणारे पद, पैसा याकडे बघून या क्षेत्रात येतात की काय असे वाटते.
– डॉ. मानसी पवार, फिजिओथेरपिस्ट
जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता हवी
रस्ते, पाणी, वीज या समस्या आहेतच, त्या सोडवण्यासाठी सर्वसाधारणपणे स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या स्तरावर प्रयत्न करतात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवार सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे की नाही या गोष्टीचा विचार मतदार म्हणून केला जावा असे वाटते. जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेला लोकप्रतिनिधी हवा असे वाटते.
– जयश्री जगताप, व्यावसायिक
मत फारसे सकारात्मक नाही
मी मतदान दरवर्षी करते, यावेळीही करणार आहे. मात्र मतदान, निवडणूक, राजकारण याबद्दल माझे मत फारसे सकारात्मक नाही. सगळे राजकारणी हे एका माळेचे मणी असतात हे निरीक्षण आहे. सर्वसामान्य नागरिक पैसे मिळवण्यासाठी नोकरी, धंदा, व्यवसाय करतात. तसे राजकारणी राजकारण करतात असे दिसते.
– मुग्धा महाजन, वास्तुविशारद
नाव, पत्ता बदलण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट
मतदान हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि ते करायला हवे हे मानते. मात्र आपल्या यंत्रणांच्या मर्यादा बघता ते शक्य होतच असे नाही. मतदार यादीत नावाचा समावेश करणे, ओळखपत्रावरील नाव, पत्ता बदलणे या प्रक्रिया अत्यंत किचकट आहेत. आधार कार्डसारख्या सुविधा उपलब्ध केल्यानंतर अठरा वर्षांवरील प्रत्येकाचे नाव मतदार यादीत सामावले जाईल एवढी यंत्रणा उभी करता येत नाही का असा प्रश्न पडतो.
– अदिती वझे, सनदी लेखापाल
..तर नागरिकांनाही लाभ होईल
प्रत्येक निवडणुकीसाठी मतदान करते, तसे ते यावेळीही करणार आहे. कारण मतदान हे आपले कर्तव्य आहे असे मी मानते. राजकारण चांगले की वाईट हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र प्रशासन, व्यवस्था आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून राजकारण आणि राजकारणी हवेत हे नाकारता येत नाही. राजकारणी चांगले हवेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत जाण हवी आणि त्या सोडवण्याबाबतची तळमळ हवी ही सर्वसाधारण मतदारांची अपेक्षा आहे. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीसारख्या गोष्टी उत्सव म्हणून सुसह्य़पणे साजऱ्या करण्याऐवजी त्याचेही राजकारण होताना दिसते, ही गोष्ट चीड आणणारी आहे. वाहतूक, पाणी या रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांवर निवडणुकांनंतरही गांभीर्याने काम होण्याची गरज आहे. केवळ राजकारण करणे आणि पैसा मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता मतदार आणि नागरिक यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले असता त्याचा लाभ शहराला आणि नागरिकांनाही होईल.
– धनश्री बापट, नोकरी