शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर यांच्या राजकीय गाठभेटीला देखील वेग आला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खोचक टोला लगावला आहे. “राष्ट्रपती कधी करणार आता करणार की, पुढच्या निवडणुकीनंतर करणार, आता राष्ट्रपती करायच म्हटलं तर सत्ता भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे राष्ट्रपती करायचे झाले असेल तर प्रशांत किशोर हे मोदींना भेटून आलेत का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. त्यामुळे त्याचा देखील शोध घ्यावा लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. ते पुणे दौर्‍यावर असतांना माध्यमांशी बोलत होते.

स्पर्धा परीक्षा देणारा स्वप्निल लोणकर या तरुणाने गेल्या महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलच्या कुटुंबियांची सांत्वन करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज सुनील आणि छाया लोणकर यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे समजून घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक विषयावर भूमिका मांडली.

आणखी चर्चा करून फाटे फोडायाचे नाहीत

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने मुंडे गट नाराज झाला. त्यामुळे पंकजा मुंडे या एकनाथ खडसे यांच्या वाटेवर आहेत का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. यावर देखील प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले, “पंकजा मुंडे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यावर आणखी चर्चा करून फाटे फोडायाचे नाहीत. पंकजा मुंडे आमच्या काल ही नेत्या होत्या, आज ही आहेत आणि उद्या ही राहतील. पंकजा मुंडे नाराजी दूर झाली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी थोडी असेल तर त्यांची देखील नाराज निश्चित दुर केली जाईल.”

मुख्यमंत्र्यानी जनतेच्या हिताच्या दृष्टीने तात्काळ निर्णय घ्यावा

“आजच्या मंत्रिमंडळात दुकानांची वेळा आणि लोकल बाबत निर्णय, ज्यांचे दोन्ही डोस झाले. किमान त्यांना तरी प्रवासाकरता मुभा मिळेल, अशी अपेक्षा राज्यातील जनतेची होती. मात्र तसा काही निर्णय झाला नाही. डोंबिवलीमध्ये काही व्यापारी वर्ग मला येऊन दुकानाच्या बाबततीत भेटून चर्चा केली. तेव्हा मी म्हटले की, आता रेल रोको आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. आम्ही सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यामुळे आज निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र दुर्देव आहे की, जनतेच्या हिताचा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे येत्या तीन चार दिवसात सरकारने निर्णय न घेतल्यास मी स्वतः रेल्वे फ्लॅटफॉर्मवर उतरेल,” असा इशारा दरेकर यांनी दिला. तसेच जनतेच्या हिताच्या दृष्टीने तात्काळ निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली.

आज प्रत्येक कुटुंबात घुसमटणारा स्वप्निल

“आज प्रत्येक कुटुंबात घुसमटणारा स्वप्निल आहे. त्यामुळे सरकारने आणखी उशीर न करता. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या पाहिजेत. आज स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आमच्या मुलासारखे इतरांच्या मुलांचे होऊ नये. ही भावना त्यांची असून त्यामुळे आता तरी सरकारने लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्यात, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून निर्णय घेण्यास भाग पाडू,” अशे प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.

Story img Loader