पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील अनेक घडामोडी बाबत रुपाली चाकणकर यांनी भाष्य देखील केले. मागील काही महिन्यात राज्यात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यात महिला आयोग अपयशी ठरत आहे. त्यामुळे महिला आयोग बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
त्या प्रश्नावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्यातील कोणत्याही भागात महिलांवर अन्याय अत्याचाराची घटना घडल्यावर महिला आयोगामार्फत तातडीने दखल घेऊन काम करत आहे. हे राज्यातील जनतेला माहिती आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवित, विरोधकांना घरीच बसवले आहे. त्यामुळे विरोधकांकडे टीका करण हा एककलमी कार्यक्रम राहिला आहे. तर या विरोधकांमधील शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांचं मला आश्चर्य वाटत ते म्हणजे त्या महिला अत्याचाराचाबाबत बोलतात. विद्या चव्हाण यांनी स्वतःच्या सुनेचा छळ केल्याच राज्यातील जनतेला माहीती आहे आणि त्या महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबत बोलत असेल, तर याच्यासारखं दुसरं दुर्देव असूच शकत नाही. त्यामुळे विद्या चव्हाण यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, असा टोला देखील विद्या चव्हाण यांना त्यांनी लगावला. त्या पुढे म्हणाल्या की, राज्यातील महायुती सरकार आणि महिला आयोग चांगल काम करीत आहे. त्यामुळे यांना उठसूठ महिला आयोगाची आठवण होते. हेच आमचं यश असल्याच देखील त्यांनी सांगितले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, कुरारमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून विरोधक आरोप करित आहेत. त्या घटनेमधील आरोपी हा तुतारी गटाचा वॉर्ड अध्यक्ष आहे. तसेच आजवर राज्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये तुतारी गटाचे पदाधिकारी फार पुढे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन समाजामध्ये कसं वावरायचं, याबाबत त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काही धडे दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांना रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला.