पुणे : पावसाळ्यात नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी महापालिकेकडून नाल्यांवर सतर्कता प्रणाली (ॲलर्ट सिस्टिम) विकसित करण्यात येणार आहे. सेंटर फाॅर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड काॅम्प्युटिंग सेंटरच्या (सी-डॅक) मदतीने ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्याबाबतचे प्राथमिक काम सी-डॅककडून सुरू करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात आंबिल ओढ्याची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरात पडणारा सरासरी आणि कमाल पाऊस निश्चित करण्यासाठी महापालिकने गेल्या १०० वर्षांतील पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. शहरातील पावसाळी गटारे आणि वाहिन्या केवळ ६० ते ६५ मिमी पावसात कार्यान्वित असतात. त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास पावसाळी गटारे आणि वाहिन्या तुंबण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यातील पाणी नाल्यामध्ये जाते. शहरात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडत असल्याचे अलीकडच्या काही वर्षांत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पावसाळी वाहिन्या आणि गटारांची क्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. मात्र जुनी व्यवस्था बदलणे आव्हानात्मक आणि वेळ घेणारी प्रक्रिया असल्याने आता नाल्यांवरच सतर्कता प्रणाली विकसित करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.

हेही वाचा – मुंबई : एटीएम व्हॅनमधील रोकड लुटून चालकाचे पलायन

ही प्रणाली विकसित करण्यासाठी सी-डॅककडून महापालिकेला मदत केली जाणार असून, या प्रणालीमुळे शहरातील पुराचे नुकसान कमी करण्यासाठी आणि तयारीसाठी पुरेसा वेळ महापालिकेला मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. सी-डॅकने शहरातील मोठ्या नाल्यांवर ही प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांच्या पर्जन्यमानाचा उपयोग केला जात असून, नाल्यामधील पाण्याच्या पातळीबाबत या प्रणालीकडे संदेश दिला जाणार आहे. पावसाळ्यात नाल्यातून किती पाणी वाहते याचे मोजमापही या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात सी-डॅकडून आंबिल ओढ्यावर ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. सतर्कता प्रणालीमुळे नाल्यातील पाण्याची पातळीची माहिती मिळणार असून, पुरापूर्वी नागरिकांचे स्थलांतर करणे शक्य होणार आहे. नाल्यातील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी पर्जन्यमापक आणि सेन्सर बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा – मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

शहरात २६७ नाले

शहरात लहान-मोठे २६७ नाले आहेत. मात्र आंबिल ओढा, भैरोबा नाला आणि माणिक बाग येथील ओढ्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

सी-डॅककडून या संदर्भात काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा आराखडा करण्यात आला असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाकडे त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात आंबिल ओढा निश्चित करण्यात आला असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य मोठे नाले आणि ओढ्यांवर प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. – गणेश सोनुने, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the flood level of the drains in pune rises you will get an alert immediately know the new system pune print news apk 13 ssb