लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू वर्षी झाल्यास ४४ लाख ५४ हजार नागरिक पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे कारभारी ठरविणार आहेत. जिल्हा निवडणूक शाखेकडून चालू वर्षी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि उर्वरित ग्रामीण भागातील जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत एकूण ७९ लाख ५१ हजार ४२० मतदार झाले आहेत. पुण्यात विधानसभेचे आठ, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन, तर उर्वरित ग्रामीण भागात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. चालू वर्षी महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यास ही मतदारयादी वापरली जाणार आहे. त्यामुळे या यादीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा… पुणेकरांना दिलासा; ‘या’ भागातील पाणीकपात तात्पुरती रद्द
प्रारूप मतदार यादी गेल्या वर्षी ९ नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यात ७८ लाख ७६ हजार ९५० मतदार होते. त्यानंतर नवमतदार, समाजातील वंचित घटकांसाठी मतदार नोंदणीच्या खास मोहिमांचे आयोजन केले होते. त्यामुळे प्रारूप मतदार यादीनंतर अंतिम यादीत ७४ हजार ४७० मतदार वाढले आहेत.
हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमधील तीन टोळ्यांवर ‘मोक्का’
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत ३० लाख १६ हजार ९४१ मतदार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदारसंघात पाच लाख ६६ हजार ४१५ मतदार आहेत. पिंपरी मतदारसंघात तीन लाख ५७ हजार २०७, तर भोसरी मतदारसंघात पाच लाख १३ हजार ७६१ मतदार आहेत. या तीन विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण १४ लाख ३७ हजार ३८३ मतदार आहेत.
मतदार म्हणून नाव कसे शोधाल?
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.
शहरातील मतदारसंख्या
मतदारसंघ – मतदार
वडगावशेरी – ४,३३,०२२
शिवाजीनगर – २,७४,१०३
कोथरूड – ३,९१,५२०
खडकवासला – ५,०८,१७२
पर्वती – ३,३०,८१९
हडपसर – ५,३६,३९७
पुणे कॅन्टोन्मेंट – २,६७,४८०
कसबापेठ – २,७५,४२८
एकूण – ३०,१६,९४१