केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाविकास आघाडीला “हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपाला हरवून दाखवावं” असं खुलं आव्हान दिलं. पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
आपल्या भाषणात बोलताना अमित शहा म्हणाले की, “मित्रांनो पंतप्रधान मोदींनी ‘डीबीटी’ निर्मिती केली. आपला ‘डीबीटी’ अर्थ हा ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ असा आहे. म्हणजे गरजवंतास थेट मदत पुरवठा. मात्र, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने ‘डीबीटी’ची नवी व्याख्या तयार केली. काँग्रेसने यामधलं ‘डी’ पकडलं त्याचा त्यांनी अर्थ काढला ‘डायरेक्ट’ च्या जागी ‘डीलर’, शिवसेनेने ‘बी’ पकडलं त्यांचा अर्थ ‘ब्रोकर’ आणि राष्ट्रवीदीने ट्रान्सफरमध्ये कट मनी. आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ म्हणतो, हे डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफरचा बिझनेस म्हणतात. सांगा महाराष्ट्राच्या जनतेला काय हवं आहे.”
“ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही ”
तसेच, “ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. टिळकांनी सांगितलं होतं, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवूनच राहील. शिवसेना म्हणते सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, कोणत्याही प्रकारे मी तो मिळवूनच राहील. आता बनले आहेत एकदा मुख्यमंत्री. मी आजही सांगू इच्छतो, जर हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात तिघंही जण एकसाथ लढण्यास या भाजपाचा कार्यकर्ता तयार आहे. महाराष्ट्राची जनता देखील हिशोब करायला तयार बसलेली आहे. अशाप्रकारचे तत्वहीन राजकारण कोणत्याही राज्यातील जनतेला कधीच आवडणार नाही.” असंही अमित शहा यांनी यावेळी बोलून दाखवलं.
PHOTOS : गृहमंत्री अमित शहा यांनी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा
याचबरोबर, “महागाई.., महागाई.. एवढी छाती बडवून घेत होते. अचानक पंतप्रधान मोदींनी निर्णय केला की आपण पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार. कमी केले मोदींनी आता वेळ आली राज्यसरकारची त्यावर भाजपाशासीत राज्यांनी देखील दर कमी केले. एकूण १५ रुपये दर कमी झाले. मात्र यांना(महाविकास आघाडी सरकारला) कदाचित ऐकण्यात त्रास झाला की काय माहिती नाही, मोदींनी आपल्या संदेशात म्हटलं होतं की, राज्य सरकारांनी देखील थोडा दर कमी करावा. त्यानंतर अनेक राज्य सरकारांकडून दर कमी केला गेला. मात्र यांनी तर दारूच स्वस्त केली. देशभरात पेट्रोल-डिझेल १५ रुपये स्वस्त झाले, महाराष्ट्रात का नाही झालं? उद्धव ठाकरे सरकारने याचं उत्तर द्यावं, असा त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे.” असं यावेळी अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.