अंदाजपत्रकात समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे छापण्याचे राजकारण सत्ताधाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले असून या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ अध्यक्षांवर शुक्रवारी आली. त्याबरोबरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य पक्षांच्या नेत्यांचीही छायाचित्रे पुन्हा छापली जातील, असेही अध्यक्षांना जाहीर करावे लागले.
महापालिका अंदाजपत्रकात पंतप्रधान तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष, पुण्याचे खासदार, आमदार, महापालिकेतील गटनेते यांची छायाचित्रे छापण्याचा प्रघात आहे. मात्र चांदेरे यांनी गेल्यावर्षीही अंदाजपत्रकात फक्त स्वत:चे, तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच छायाचित्र छापले होते. यंदाही त्यांनी असाच प्रकार केला आहे. छायाचित्रांच्या या राजकारणावर यंदा तीव्र प्रतिक्रिया उमटली असून महापालिकेची खास सभा सुरू होताच शुक्रवारी काँग्रेससह मनसे, भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा मुद्दा उचलून धरला. याचवेळी सभागृहात ज्या पाच नगरसेवकांची छायाचित्र अंदाजपत्रकात नव्हती त्या छायाचित्रांचे स्टिकर अंदाजपत्रकात चिकटवले जात होते.
अंदाजपत्रकात मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी हरकत या वेळी घेण्यात आली. रवींद्र धंगेकर, बाळा शेडगे, अशोक हरणावळ, संजय बालगुडे, मुकारी अलगुडे, धनंजय जाधव, गणेश बीडकर, विजय देशमुख, सुधीर जानजोत, पुष्पा कनोजिया, तसेच काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेता वसंत मोरे यांनी छायाचित्रांच्या या राजकारणावर जोरदार टीका करत महापालिकेचे पाच स्वीकृत नगरसेवक तसेच मुख्यमंत्र्यांसह खासदारांना, आमदारांना, गटनेत्यांना तुम्ही कसे विसरलात, असा प्रश्न यावेळी उपस्थित के ला. मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र न छापल्याबद्दल अरविंद शिंदे यांनी या वेळी जाहीर निषेध केला.
अखेर या अंदाजपत्रकात पाच स्वीकृत नगरसेवकांची छायाचित्रे छापण्याचे नजरचुकीने राहून गेले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून चांदेरे म्हणाले की, काही फोटो छापण्याचे राहिले आहेत. ते समाविष्ट करून आपण अंदाजपत्रक फायनल करू.
 

Story img Loader