अवघड घाट चढायला दोन इंजिन जोडावी लागतात. मनसेचे इंजिन युतीला जोडावे, अशी जनतेची इच्छा आहे. मात्र, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत, अशा शब्दांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनाला टोला लगावला.
के. के. मार्केट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या बायोगॅस व वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महापौर वैशाली बनकर, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, गटनेते अशोक येनपुरे, मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे, गटनेते वसंत मोरे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, अस्मिता शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, शिवसेना, भाजप, मनसेची युती व्हावी, यासाठी जनतेने वेळोवेळी संदेश दिला आहे. पण, आम्ही ते ऐकायला तयार नाही.
पुण्याच्या विकास आराखडय़ाबाबत ते म्हणाले, पुण्यातील नागरिक जागरुक आहेत. विकास आराखडय़ावर हजारो हरकती घेण्यात आल्या. नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार केल्याशिवाय विकास आराखडा मंजूर होऊ देणार नाही. आराखडय़ातील टेकडी माथे, उताराच्या प्रश्नावर न्यायालयात जाण्याचा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला होता. नेत्यांवरच असे बोलण्याची वेळ येत असेल, तर स्थानिक लोकप्रतिनिधींचे ते अपयश आहे. निवडणुकीच्या काळात कितीही राजकारण केले तरी निवडणुका संपल्यावर मात्र लोकप्रतिनिधींनी राजकीय जोडे बाजूला ठेवून काम केले पाहिजे. त्यातूनच शहराचा विकास होऊ शकेल.

Story img Loader