आवारात यायचे तर चालत किंवा सायकलवर, रस्त्यावरील सर्व दिवे सौरऊर्जेवर, पार्किंगच्या छपरावर सोलर पॅनेल, सर्व बागांना पुनर्वापर केलेले पाणी अन् दालनांमध्ये पाच मिनिटे हालचाल झाली नाही तर दिवे आपोआप बंद होणार..
हे आहे पुण्यात असलेल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात ‘आयसर’च्या आवाराचे वर्णन! आयसर म्हणजे विज्ञानाचे शिक्षण आणि संशोधन या दोन्ही बाबतीत प्रशिक्षण देणारी देशातील अव्वल संस्था. या संस्थेचे आवार पूर्णपणे पर्यावरणस्नेही करण्यात येत आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आयसरमध्ये या निमित्ताने विज्ञान आणि पर्यारवरणाचा मिलाफ पाहायला मिळणार आहे. या संस्थेच्या मुख्य इमारतीचे येत्या रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
पुण्यात पाषाण रस्त्यावर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला (एनसीएल) लागूनच ‘आयसर’चे आवार आहे. ते तब्बल ९८ एकरात पसरलेले आहे. या आवारात मुख्य इमारत, विविध प्रयोगशाळा, वसतिगृह, राहण्याच्या इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयसरचे आवार विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल ८५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या आवाराच्या वैशिष्टय़ाबाबत म्हणजे संचालक डॉ. के. एन. गणेश यांनी सांगितले, ‘‘हे आवार पूर्णपणे पर्यावरणस्नेही राहील याचा विचार करण्यात आला आहे. या आवारात तब्बल आठ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ती स्थानिक वातावरणाशी सुसंगत असतील याची विचार करण्यात येणार आहे. या संस्थेच्या आवाराचा कडेचा भाग वगळता मुख्य आवारात वाहनांना बंदी असेल. या ठिकाणी यायचे असेल तर चालावे लागेल किंवा सायकलचा वापर करावा लागेल.’’
‘‘याशिवाय इतरही अनेक गोष्टी करण्यात येत आहेत. सर्व बागांसाठी पुनर्वापर केलेले पाणी वापरले जाते. इथल्या सर्व रस्त्यांवर दिवे असतील ते सौरऊर्जेवर चालणारेच. आवारातील पार्किंग वैशिष्टय़पूर्ण असेल. त्याचे छप्पर सोलर पॅनेल्सनी बनलेले असेल. तिथे सर्वकाळ ऊर्जानिर्मिती सुरू राहील. येथील इमारतींमधील कक्ष आणि दालनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ हालचाल झाली नाही, तर विजेचे दिवे व इतर उपकरणे आपोआप बंद होतील.’’
‘‘अत्युच्च विज्ञान शिकत असताना पर्यावरणाचाही असा विचार करणे गरजेचे आहे. त्यातील तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणस्नेही गोष्टी बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत,’’ असे डॉ. गणेश यांनी सांगितले.
पर्यावरणस्नेही आवार :
– आवारात वाहनांना बंदी
– रस्त्यांवरील दिवे सौरऊर्जेवर
– स्थानिक प्रजातींची ८००० झाडे लावणार
– पार्किंगवरही सोलर पॅनेल
– बागांना पुनर्वापराचे पाणी
– हालचाल नसल्यास दिवे ५ मिनिटांत बंद
विज्ञान-पर्यावरणाचा असाही मिलाफ!
आवारात यायचे तर चालत किंवा सायकलवर, रस्त्यावरील सर्व दिवे सौरऊर्जेवर, पार्किंगच्या छपरावर सोलर पॅनेल, सर्व बागांना पुनर्वापर केलेले पाणी अन् दालनांमध्ये पाच मिनिटे हालचाल झाली नाही तर दिवे आपोआप बंद होणार..
First published on: 13-06-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iiser eco friendly science environment