आयजीईएम’ स्पर्धेत पारितोषिक
पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) विद्यार्थ्यांनी विमानासाठीचे पर्यावरणपूरक जैवइंधन तयार करण्यासाछी ‘जट्रोइको’ ही नवी पद्धती विकसित केली आहे. वन एरंड (जट्रोफा करकॅस) या वनस्पतीचे तेल आणि यीस्ट यांच्या मिश्रणातून होणाऱ्या प्रक्रियेद्वारे विमानासाठीचे जैवइंधन तयार करण्यात आले असून, या संशोधनाला ‘आयजीईएम’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
विमानांच्या उड्डाणातून कार्बन डायऑक्साइड या वायूचे होणारे उत्सर्जन प्रदूषणकारी आहे. त्यामुळे विमानांद्वारे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक स्तरावर विविध प्रयोग करण्यात येत आहेत. त्यातूनच जैवइंधनाचा पर्याय पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर आयसर पुणेच्या विद्यार्थ्यांनी ‘इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनिअर्ड मशीन’ (आयजीईएम) स्पर्धेत पर्यावरणपूरक जैवइंधन निर्मितीचे संशोधन सादर केले. जगभरातील चारशेहून अधिक संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पहिल्या दहा पदवीपूर्व संघांमध्ये स्थान मिळवणारा आयसर पुणे हा एकमेव भारतीय संघ ठरला. तसेच या संघाने सर्वोत्कृष्ट शिक्षण पुरस्कारावरही नाव कोरले. तसेच सर्वोत्कृष्ट प्रकल्प, सर्वोत्कृष्ट सादरीकरण अशा अन्य पारितोषिकांसाठीही या प्रकल्पाला नामांकन प्राप्त झाले.
हेही वाचा >>> ‘एनडीए’च्या दीक्षांत संचलनाला राष्ट्रपतींची उपस्थिती
प्रा. साईकृष्णन कायरत यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांच्या चमूमध्ये ऑयिन्ड्रिला सामंता, इशान चौधरी, औथिसा थिरूमणी, सेल्वम, प्रणेश पी., अनुविंद प्रमोद, केतक कापडणीस, अल्फी सजीव, अपराजिता श्रीनिवासन, अपूर्वा गोपाल, प्रतीक मखिजा, राजलक्ष्मी बेहेरा, रोहणेश्वर मणिकंदन, सशांक चंद्र रेड्डी सिंगम, युवराज बेलानी यांचा समावेश होता.
वन एरंड या वनस्पतीमध्ये तेल निघण्याची क्षमता आहे. या तेलामध्ये असंपृक्त स्निग्धाम्ले असतात. सिटेन रेटिंग मोठय़ा प्रमाणात असते. तसेच सल्फरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे विमानासाठीचे इंधनाची त्यात क्षमता असते. ही बाब विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी इंधन विकसित करण्याची नवी पद्धत विकसित केली. त्यात वन एरंड या वनस्पतीचे तेल, यारोविया लिपॉलिटिका या यीस्टच्या मिलाफातून होणाऱ्या प्रक्रियेतून असंपृक्त स्निग्धाम्लांचे रुपांतर हायड्रोकार्बनमध्ये होऊन पर्यावरणपूरक जैवइंधन विकसित करणे शक्य असल्याचे या संशोधनातून पुढे आले.
‘आयजीईएम’ स्पर्धा काय?
कृत्रिम जीवशास्त्रातील शिक्षण आणि संशोधनासाठी ‘आयजीईएम’ ही संस्था कार्यरत आहे. दैनंदिन जीवनातील समस्यांवर कृत्रिम जीवशास्त्राच्या माध्यमातून उपाय शोधण्याच्या उद्देशाने पदवीपूर्व विद्यार्थी, शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते.