खासगी महाविद्यालयांमध्ये बेकायदा पद्धतीने व्यवस्थापन कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळणार नाही, असे स्पष्ट आदेश प्राधिकरणाचे सचिव आणि राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी सेल) आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) संचालक डॉ. अभय वाघ यांना दिले.
हेही वाचा >>>राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल गुन्हयाचा तपास बंद
सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र अशा व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्य़ासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वीच नामांकित खासगी महाविद्यालयांनी त्यांच्या व्यवस्थापन कोट्यातील (मॅनेजमेंट कोटा) जागा भरल्या आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) फेऱ्या झाल्यानंतर आणि गुणवत्ता याद्या तयार करून खासगी महाविद्यालयातील जागा भरण्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी सीईटी सेलकडे दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने परिपत्रक प्रसिद्ध केले. प्रवेशाच्या नियमानुसार व्यवस्थापन प्रक्रिया राबवण्याच्या सूचना डीटीईमार्फत सर्व खासगी महाविद्यालयांना द्याव्यात. नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मान्यता दिली जाणार नसल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सीईटी सेलकडून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच खासगी महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश नियमबाह्य पद्धतीने दिले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रवेश रद्द करून नियमानुसार मॅनेजमेंट कोट्याची प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी आहे, असे युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी सांगितले.