लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लोक अभिरक्षक कार्यालयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर आरोपीची न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही, असे निरीक्षण नोंदवून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी आरोपीची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली आहे. प्रशांत दशरथ पाटील (वय २४) असे जामिनावर मुक्तता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा… पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाटील याला अटक करण्यात आली होती. या तरुणाने भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाइललवर संपर्क साधून भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने तपास करुन तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले. आरोपी तरुणाने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा दूरध्वनी केल्याचे उघडकीस आले होते.

हेही वाचा… पुण्यात सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची ‘नासा’कडून निवड

आरोपीला अटक केल्यानंतर त्याला वकील न दिल्याने त्याची बाजू मांडण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून विनामूल्य विधी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधीज्ज्ञ ॲड. सचिन साळुंके यांनी आरोपीची बाजू मांडली. अर्नेश कुमार विरुद्ध बिहार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सात वर्षांपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याला नोटीस बजावणे आवश्यक आहे, तसेच गुन्हा अदखलपात्र असल्याने त्याची चौकशी आणि अटक करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. या दोन्ही बाबी पोलिसांनी पाळल्या नाहीत. त्यामुळे आरोपीला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे, असा युक्तीवाद ॲड. साळुंके यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरुन पाटील याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal arrest of accused in case of threat to chhagan bhujbal pune print news rbk 25 dvr
Show comments