संजय जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : मागील काही दिवसांपासून ससून सर्वोपचार रुग्णालय चुकीच्या कारणांसाठी चर्चेत येत आहे. आता रुग्णालयात बेकायदा पद्धतीने वाहनतळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाहनतळाचे कंत्राट संपूनही वर्षभरापासून कंत्राटदार वाहनचालकांकडून बेकायदा पद्धतीने शुल्काची वसुली करीत आहे.

ससून रुग्णालयातील वाहनतळ चालविण्याचे कंत्राट एस.के. एंटरप्रायजेस या कंपनीला नोव्हेंबर २०२० मध्ये देण्यात आले होते. हे कंत्राट दोन वर्षांसाठी होते. या कंत्राटाची मुदत मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आली. रुग्णालयाच्या आवारात चार ठिकाणी वाहनतळ आहेत. दुचाकी वाहनचालकांकडून पहिल्या दोन तासांसाठी ५ रुपये, १२ तासांसाठी १० रुपये आणि २४ तासांसाठी १५ रुपये शुल्क आकारले जाते. मोटार, जीप, रिक्षा आणि इतर वाहनांना पहिल्या २ तासांसाठी १०, १२ तासांसाठी २५ आणि २४ तासांसाटी ४० रुपये शुल्क आकारले जाते.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; पुणे पोलिसांची कारवाई

ससून रुग्णालयातील वाहनतळाबाबत माहिती अधिकारांतर्गत माहिती मागविण्यात आली होती. त्यावर ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या उत्तरात कंत्राटाचा कालावधी संपल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. याचबरोबर करारावर ससूनच्या अधिष्ठात्यांची स्वाक्षरीही नसल्याचे समोर आले आहे. करारातील अटीनुसार, कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना गणवेश आणि ओळखपत्र देणे बंधनकारक आहे. तरीही कंत्राटदाराने या दोन्ही गोष्टी कर्मचाऱ्यांना दिलेल्या नाहीत. कालावधी संपूनही कंत्राटदार वाहनचालकांकडून कोणत्या आधारावर शुल्क वसुली करीत आहे, याचे उत्तरही रुग्णालय प्रशासनाकडे नाही.

महिन्याला दीड लाखांचे शुल्क नावालाच

ससून रुग्णालय प्रशासनाला वाहनतळ कंत्राटदाराकडून महिन्याला १ लाख ५१ हजार ५०० रुपये शुल्क दिले जात होते. कंत्राट संपल्यापासून मागील वर्षभराचे शुल्क न भरताच त्याच्याकडून वाहनतळ चालविला जात आहे. संबंधित कंत्राटदाराचा अपघात झाल्याने तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे त्याच्याकडून शुल्क मिळाले नसल्याचा युक्तिवाद प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु, कंत्राटदाराने काही धनादेशही प्रशासनाला दिले होते, तेही बँकेत जमा करण्यात आलेले नाहीत. या दिरंगाईबद्दलही रुग्णालयाचे प्रशासन मौन बाळगून आहे.

आणखी वाचा-पुणे: नारायण पेठेतील सराफी पेढीवर प्राप्तिकर विभागाचे छापे

दुप्पट वसुली सुरू

वाहनतळात वाहन लावण्यास पहिल्या दोन तासांसाठी पाच रुपये शुल्क आहे. प्रत्यक्षात वाहनतळावरील कर्मचारी वाहनचालकांकडून दहा रुपयांची वसुली करीत आहेत. अशा प्रकारे दुप्पट वसुली सुरू असून पावती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. पावती मागितल्यास वाहन क्रमांकांची खाडाखोड करुन जुनीच पावती हातात टेकवली जात आहे.

ससूनमधील वाहनतळाचे कंत्राट मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये संपले. नवीन कंत्राटदाराची निवड होईपर्यंत त्यालाच मुदतवाढ देण्यात आली. त्याच्याकडून दरमहा मिळणारे शुल्क बाकी आहे. त्याने हमी म्हणून दिलेले धनादेश आमच्याकडे असून, ते बँकेत भरून पैसे वसूल केले जाणार आहेत. -अनिल माने, कार्यालयीन अधीक्षक, ससून रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal collection of fees from drivers by contractor after parking lot contract is over in sassoon hospital pune print news stj 05 mrj