पिंपरीच्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली छोटय़ा व्यावसायिकांचे बस्तान; भोसरी, डांगे चौकाचे बकालीकरण

शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांना अतिक्रमणाने विळखा घातला आहे. पिंपरीच्या इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली छोटय़ा व्यावसायिकांनी पाय पसरले आहेत. भोसरी, डांगे चौक यासह सर्वच उड्डाणपुलांखाली फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे. मतांच्या लांगुलचालनासाठी राजकीय पाठबळ असलेल्या या व्यावसायिकांवर महापालिकेचा अतिक्रमण विभागही कारवाई करत नसल्याने शहराच्या बकालपणात वाढ होत आहे.

आशिया खंडात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील वाहतूक सुरळित करण्यासाठी तसेच भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल बांधले आहेत. त्यातील कासारवाडी नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपूल सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र, येथेही पथारीवाले हळूहळू पाय पसरू लागले आहेत आणि त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. या महत्त्वाच्या पुलाच्या परिसरात अतिक्रमण सुरू असले तरी कारवाई केली जात नसल्याने अतिक्रमणांच्यात वाढच होत आहे. पिंपरीच्या उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांचा विळखा आहे. या पुलाखाली छोटय़ा व्यावसायिकांनी बस्तान बसविले आहे. उड्डाणपुलावर रिक्षा चालकांनी अनधिकृत रिक्षा थांबे तयार केले आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळित करण्याचे सोडून रिक्षा थांब्याच्या जवळ उभे राहतात आणि पावत्या फाडण्याचे काम करतात असे येथील चित्र रोजचेच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निगडी येथील उड्डाणपुलाखाली वाहनतळ उभे राहिले आहे. शहरातील सर्वच उड्डाणपुलांची अवस्था सारखीच आहे. स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून काही गुंड तरुण छोटय़ा व्यावसायिकांकडून हप्ते वसूल करून त्यांना संरक्षण देतात. त्यामुळे दिवसेंदिवस उड्डाणपुलांखालील जागांवर अतिक्रमणे वाढत आहेत. वाहतूक सुरळित करण्यासाठी निर्माण केलेल्या उड्डाणपुलाखाली होत असलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न तयार होत आहे. भोसरीच्या उड्डाणपुलाखाली अनधिकृत वाहनतळाने आणि पथारीवाल्यांनी उड्डाणपूल व्यापला आहे. त्यामुळे पीएमटी चौकात वाहतुकीची समस्या कायमचीच होऊन बसली आहे. स्पाईन रस्त्यावर कुदळवाडी येथे प्राधिकरणाने नव्याने बांधलेल्या उड्डाणुलावर राजरोसपणे ट्रक आणि ट्रॅव्हलर लावलेल्या असतात. त्यामुळे तेथून जाणाऱ्या अन्य वाहनांना त्याचा त्रास होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. उड्डाणपुलांखालील अतिक्रमणांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्त कारवाई करण्याची गरज आहे.