पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे चालवण्यात येणाऱ्या जलतरण तलावाच्या जागेतच दोन वर्षांपासून बेकायदेशीर क्रिकेट अकादमी चालवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अकादमीच्या माध्यमातून संगनमताने लाखो रुपयांची कमाई झाली असताना, महापालिकेला मात्र एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे: एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महिला पोलीस अधिकारी निलंबित
कासारवाडी-पिंपळे गुरव रस्त्यावर पालिकेचा जलतरण तलाव आहे. सकाळी ६ ते १० आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ अशी तलावाची वेळ आहे. गेल्या दोन वर्षांपासून या तलावाच्या ठिकाणी क्रिकेट अकादमी सुरू आहे. पालिकेला याबाबतची माहिती नाही. अकादमीसाठी पालिकेकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच या अकादमीपासून पालिकेला उत्पन्न मिळालेले नाही. अकादमीत अनधिकृतपणे येणाऱ्या व्यक्तींकडून ठरावीक शुल्क आकारले जाते. या ठिकाणी दररोज कितीजण येतात, त्यांच्याकडून किती पैसे जमा होतात, याविषयी नोंद नाही. दोन वर्षांत याद्वारे लाखो रुपये गोळा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत काही नागरिकांनी याबाबत जनसंवाद सभेतही तक्रार केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या प्रभागाच्या माजी नगरसेविका स्वाती काटे यांनी यासंदर्भात पालिका आयुक्त तसेच क्रीडा विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काटे यांनी केली आहे.
हेही वाचा >>>पुणे: राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्प कक्षातील अभियंत्यांच्या बदल्या
कासारवाडीतील जलतरण तलावात २०२० पासून बेकायदेशीरपणे क्रिकेट अकादमी चालवण्यात येत आहे. यासाठी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. हा प्रकार गंभीर असून याची चौकशी करावी; तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.- स्वाती काटे, माजी नगरसेविका, कासारवाडी-दापोडी प्रभाग