पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये सांगवी, ताथवडे, चिंचवड, दापोडी, हिंजवडी आदी भागामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये तब्बल तीस लाख ५० हजारांची वीजचोरी पकडण्यात आली आहे. दुसऱ्या एका मोहिमेत पिंपरी गावामध्ये तब्बल पावणेसातशे अवैध वीजजोड सापडले असून, हे वीजजोड पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आले.
पिंपरी विभागामध्ये विविध ठिकाणी विभागस्तरावरून वीजमीटर तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. वीजवापर संशयास्पद असणाऱ्या १७० वीजमीटरची तपासणी करण्यात आली. त्यात ३५ ठिकाणी सुमारे ३० लाख ५० हजार रुपयांच्या विजेची चोरी, तर तीन ठिकाणी अनधिकृत वापर उघडकीस आला. खराळवाडी उपविभागातील पिंपरी गावामध्ये भाटनगर, आंबेडकरनगर, िलक रस्ता, भीमनगर, पिंपरी भाजी मंडई, सुभाषनगर, आंबेडकर कॉलनी, निराधारनगर आदी परिसरात पोलीस बंदोबस्तात वीजचोरीविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ६७२ ठिकाणी थेट वीजचोरी सुरू असलेले अवैध वीजजोड तोडण्यात आले, तर तीन ठिकाणी वीजमीटर असतानाही वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले.
पोलिसांच्या सहकार्याने झालेल्या या कारवाईत सुमारे एक हजार नागरिकांनी अधिकृत नवीन वीजजोडणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. महावितरणकडून या नागरिकांना नियमानुसार नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असून, आवश्यक कागदपत्र व अर्ज याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे. पिंपरी विभागातील या दोन्ही मोहिमांमध्ये मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता धनंजय औंढेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र खडक्कर, धवल सावंत, सतीश सरोदे, मंगेश साळुंके आदींसह ९५ अभियंते, अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा