अतिक्रमणांना लोकप्रतिनिधींचे अभय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातील सेवा रस्ते तसेच पदपथ गायब होण्यास आणि शहराला अतिक्रमणांचा विळखा बसण्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच आहे. मुळातच अतिक्रमण करणाऱ्यांना राजकीय नेतेमंडळींनी अभय दिले असल्याने सगळे मुसळ केरात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरील छुप्या हप्तेगिरीने अतिक्रमणांची मूळ समस्या कायम राहिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व गावांमध्ये व प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमणांनी कहर केला आहे. सर्वाधिक भीषण परिस्थिती थेरगाव चौक, पिंपरी बाजारपेठ, सांगवी, भोसरी, मोशी अशा अनेक भागात दिसून येते. भोसरीत कोणत्याही बाजूने भोसरीच्या मुख्य चौकात आल्यानंतर रस्त्यावरील पथारीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे काय बजबजपुरी माजली आहे, याची प्रचिती येते. गेल्या कित्येक वर्षांपासून भोसरीत ही परिस्थिती आहे, त्यात काडीचाही फरक पडलेला नाही. लग्नसराईत ही समस्या आणखी तीव्र होते. मात्र, याकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही. राजकीयदृष्टय़ा गब्बर नेते मंडळी या भागात कार्यरत आहेत. मात्र, हा प्रश्न कोणालाही सोडवता आला नाही.

थेरगावमध्ये तसेच चित्र आहे. डांगे चौक ते ‘१६ नंबर’ या पट्टय़ात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. तेथून वाहने काढणे अथवा पायी वाटचाल करणे हे मोठे दिव्यच मानले जाते. पिंपरी बाजारपेठेत कोणतेही नियम, कायदे लागू पडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थेट रस्त्यावर थाटली आहेत. त्यांना कोणीही अटकाव करत नाही. कारवाई करण्याची धमक पोलीस तसेच अतिक्रमण विभागात नाही. येणारा ग्राहक कुठेही वाहन लावत असल्याने या समस्येत भरच पडते. सांगवी, नवी सांगवी भागात नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड होऊन बसले आहे. मात्र, त्याचा कोणीही विचार करत नाही. मासूळकर कॉलनीत दोन्ही बाजूने अतिक्रमण असल्याने मधल्या भागातून वाहने चालवताना नागिरकांना कसरत करावी लागते. संततुकारामनगर येथे टपऱ्यांच्या अतिक्रमणामागे अर्थकारण आहे, हे उघड गुपित आहे. टपरीधारकांकडून हप्ते गोळा करणाऱ्यांमध्ये राजकीय मंडळीच सर्वाधिक आहेत. टपऱ्यांसमोर जमा होणारी तरूणाई, त्यांची उभ्या-आडव्या पद्धतीने लावण्यात येणारी वाहने यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा ठरतो. कासारवाडीत रेल्वे फाटकाकडे जाणारा रस्ता तसेच फाटकापासून ते िपपळे गुरवच्या पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा विचका झाला आहे. शहरातील जवळपास प्रत्येक भागात थोडय़ाफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. राजकीय नेतेमंडळींनी मनावर घेतल्यास हे चित्र बदलू शकते. मात्र, तशी इच्छाशक्ती दिसून येत नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal encroachment issue in pimpri