राहुल खळदकर
पुणे : बांगलादेशातील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कमरुल मंडल याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली आणि एका दलालाला हाताशी धरून पुण्यातून पारपत्र मिळविल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मंडल याच्यासह सहा बांगलादेशी घुसखोरांना न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा >>> “आता अनेकांची तोंडं बंद होणार आणि…”; ललित पाटीलच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
लष्कराची गुप्तचर यंत्रणा, तसेच हडपसर पोलिसांनी कमरुल मंडल याच्यासह सहा बांगलादेशी घुसखोरांना पुण्यातील हडपसर भागातून अटक केली होती. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, पारपत्र जप्त करण्यात आले होते. बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, पॅनकार्ड, पारपत्र मिळवून देणाऱ्या दलालाचा शोध पोलिसांनी घेतला. पोलिसांनी त्याच्याकडून पारपत्र जप्त केले आहे. अटक केलेले बांगलादेशी घुसखोरांचे पश्चिम बंगालमधील एका बँकेत खाते होते. या खात्यातून ते बांगलादेशात पैसे पाठवित होते. बांगलादेशी घुसखोर कमरुल मंडलने बांगलादेशात बाॅम्बस्फोट घडविला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. तेथील न्यायालयाकडून जामीन मिळवल्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला. त्याने भारतात बेकायदा प्रवेश केला. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.