पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी हा परिसर अवैध भंगार मालाचे आगार झाले आहे. परवाना न घेता सुरू असलेल्या भंगार मालाच्या दुकानांमुळे पर्यावरण, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आदी समस्या निर्माण होत आहेत. कोटय़वधी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या व्यवसायाला राजकीय आणि गुन्हेगारीचे उघड पाठबळ मिळत असल्यामुळे काळा पैसा तयार करण्याचे केंद्र असलेल्या भंगार व्यवसायावर कारवाई करण्याचे धाडस महापालिका आणि पोलीस प्रशासनही करत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमी वेळेत आणि कमी गुंतवणुकीमध्ये पैसा दुप्पट करण्याचा व्यवसाय म्हणून भंगार व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या कुदळवाडी, चिखली आणि जाधववाडी परिसरात भंगार व्यवसाय फोफावत आहे. शहराच्या काळेवाडी, निगडी, पिंपरी, रहाटणी, चिंचवड आदी ठिकाणी निवासी भागातही भंगार व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो. कुदळवाडी परिसरात परप्रांतीय नागरिकांनी या व्यावसायामध्ये बस्तान बसविले आहे. स्थानिक नागरिक आणि गुन्हेगारांना हाताशी धरून हा व्यवसाय विनापरवाना केला केला जातो. ज्वलनशील असणाऱ्या भंगार वस्तूंची साठवणूक केली जात असल्याने कुदळवाडी परिसरात आगीच्या घटना वारंवार घडतात. औद्योगिक कंपन्यांमधून आणलेले भंगार ऑइलमिश्रित असते. त्याशिवाय लाकडी वस्तूंचे भंगारही मोठय़ा प्रमाणात साठविले जाते. त्यामुळे एकदा आग लागली की ती दोन-दोन दिवस विझत नाही कुदळवाडीमध्ये भंगाराच्या दुकानाला दिवाळीमध्ये आग लागली होती. महापालिकेशिवाय खाजगी बंब दोन दिवस ही आग विझवत होते तरीही तीन ते चार दिवस आग धुमसत होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुरक्षाविषयक कोणतीही व्यवस्था नसलेल्या भंगार दुकानांमध्ये पुढेही मोठी हानी होऊ शकते. अशा घटना वारंवार घडूनही आग प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात नाहीत. किंवा कोणतीही कारवाई केली जात नाही.  कुदळवाडीतील ९० टक्के भंगार दुकानांना परवाना नाही. विनापरवाना चालविल्या जात असलेल्या भंगार व्यवसायातून कोटय़वधी रुपयांची आर्थिक उलाढाल केली जाते. सरकारचा आणि महापालिकेचा कर चुकविला जातो. अनेक परप्रांतीय व्यावसायिकांचे बँकेमध्ये खातेही नाही. त्यामुळे कुदळवाडी चिखलीमधील भंगार व्यवसाय हे काळ्या पैशाचे केंद्र बनले आहे. हा व्यवसाय निवासी भागात असल्यामुळे तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. या परिस्थितीकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही, तर स्मार्ट सिटीच्या बकालपणामध्ये वाढच होण्याची शक्यता आहे.

  • पिंपरीत नव्वद टक्के भंगार व्यावसायिक बेकायदेशीर
  • आग प्रतिबंधक यंत्रणेकडे व्यावसायिकांचे दुर्लक्षच
  • भंगार व्यवसायात गुन्हेगारही सक्रिय
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal scrap business in pune