गेले काही महिने पुणेकरांच्या मनात भीती निर्माण केलेली स्वाइन फ्लूची साथ ओसरली असून आता उन्हाळ्यात नेहमी दिसणाऱ्या किरकोळ आजारांना सुरूवात झाली आहे. लघवीला जळजळ होणे, लहान मुलांत दिसणारा गोवरसदृश लक्षणे दाखवणारा उन्हाळी ताप आणि उलटय़ा-जुलाबांचे रुग्ण गेल्या आठवडय़ापासून बघायला मिळत असून त्यासाठी काळजी घेण्याचा, तसेच वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
डॉ.अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘सध्या कोणत्याही आजाराची साथ नसून उन्हामुळे होणारे डोके दुखणे, ताप येणे, सर्दी-खोकला असे किरकोळ आजारच अधिक दिसत आहेत. मुतखडय़ाचा त्रास असलेले रुग्ण सध्या आढळत असून काहींना लघवीच्या जागी जळजळ होण्यासारखी लक्षणे दिसत आहेत. उन्हाळ्यात केवळ जेवल्यावर किंवा तहान लागल्यावरच पाणी न पिता दर तासाला अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे. एरवीपेक्षा दीड ते दोन लिटर अधिक पाणी प्यायला हवे. त्यामुळे अशा प्रकारचे त्रास टाळता येऊ शकतील.’’
लहान मुलांमध्ये ताप आणि त्याबरोबर येणारे पुरळ हा आजारही दिसू लागला असल्याचे डॉ. सुहास नेने यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘काहीशी गोवरासारखी लक्षणे दिसणारा पण प्रत्यक्षात गोवर नसणारा हा आजार प्रामुख्याने दीड वर्षांपासून १०- १२ वर्षांच्या मुलांमध्ये दिसू लागला आहे. हा विषाणूजन्य ताप असून त्यात ३ ते ४ दिवस ताप येतो, तोंडावर आणि छातीवर प्रथम पुरळ येते आणि नंतर ते पुरळ पायांकडे सरकत जाते. पुरळ जायची वेळ आली त्या ठिकाणची कातडी कोंडय़ासारखी निघू लागते. हा आजार उन्हाळ्यात नेहमी दिसून येतो.’’ मार्चमध्ये कांजिण्याचे रुग्णही बघायला मिळत होते, पण त्यांची संख्या एप्रिलच्या सुरूवातीपासून कमी झाल्याचे ते म्हणाले.
उलटय़ा, जुलाब आणि त्यामुळे शरीरातील पाणी कमी होणे याचे रुग्णही एक आठवडय़ापासून दिसू लागले आहेत, अशी माहिती डॉ. संदीप बुटाला यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘उलटय़ा, जुलाब होऊन थकल्यासारखे वाटणे अशी लक्षणे काही रुग्णांना दिसत आहेत. पण बाहेरचे खाणे व पाणी पिणे अनेकांना टाळता येण्यासारखे नसते. त्यामुळे या आजारांना ठोस प्रतिबंधक उपाय नाही.’’
मुलांच्या परीक्षा सुरू असण्याच्या काळात त्यांनी बाहेरचे खाऊ नये, उन्हात खेळू नये यासंबंधी विशेष काळजी घेतली जाते. परीक्षा संपल्यावर मात्र खाण्यापिण्यावरचा ताबा सुटण्याकडे कल राहात असल्यामुळे उलटय़ा-जुलाबांसारखे आजार वाढू शकतील, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
उन्हाळी आजारांचा हंगाम सुरू!
गेले काही महिने पुणेकरांच्या मनात भीती निर्माण केलेली स्वाइन फ्लूची साथ ओसरली असून आता उन्हाळ्यात नेहमी दिसणाऱ्या किरकोळ आजारांना सुरूवात झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 15-04-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illness swine flu doctors summer