पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत अति मुसळधारेचा अंदाज आहे. किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार असून, रत्नागिरी आणि साताऱ्यात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना लाल इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत पावसाचा विशेष जोर राहणार आहे. बहुतांश ठिकाणी अतिमुसळधारेची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, अमरावतीला नारंगी इशारा देण्यात आला असून, मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> डाळिंबावर तेल्या रोगाचे संकट; दुष्काळी पट्ट्यातील सततच्या पावसाचा परिणाम

पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला लाल इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत संततधारेची शक्यता आहे. किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्याला नारंगी इशारा देण्यात आला असून, मध्यम ते मुसळधारेची शक्यता आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातही पावसाचा जोर कायम आहे.

हेही वाचा >>> मनोरमा खेडकर यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शुक्रवारसाठी इशारे

लाल इशारा – रत्नागिरी, सातारा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया

नारंगी इशारा – सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर

पिवळा इशारा कोल्हापूर, नगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम राहील. राज्याच्या अन्य भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. – एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे